जिल्ह्यातील ५४ तलाव कोरडे
By Admin | Updated: March 29, 2017 00:27 IST2017-03-29T00:27:07+5:302017-03-29T00:27:07+5:30
यंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हाचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ५४ सिंचन तलाव कोरडे पडले आहेत़

जिल्ह्यातील ५४ तलाव कोरडे
दुष्काळाची झळ : गुरे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, मार्चअखेरची स्थिती
धामणगाव रेल्वे : यंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हाचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ५४ सिंचन तलाव कोरडे पडले आहेत़ या तलावात पाणीच नसल्यामुळे गावातील शेतात चरायला गेलेले गुरे व वण्यप्राणी यांची पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे़ ही स्थिती मार्च महिन्याच्या अखेर असल्यामुळे आगामी मे महिन्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे़
जिल्ह्यात जिल्हापरिषद अंतर्गत ६५ सिंचन तलाव आहेत़ या तलावाची खोली सरासरी अडीच मीटर ते चार मीटरपर्यंत आहे़ यंदा या पावसाळ्यात २२ तलाव केवळ १०० टक्के भरले होते, तर ११ तलाव ६० टक्क्यावर तसेच २० तलावात ५०टक्के, ८ तलावांत २५ टक्के व ४ तलावांत १० टक्के जलसाठा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. आता या तलावातील जलसाठा पूर्णत: संपला असून सध्या यातील अनेक तलाव कोरडे पडले आहेत़ गावातील जनावरे सकाळी चरायला गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा मोठा आधार मिळत असत विशेषत:जंगलातील वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. आता तलावात पाणीच नसल्यामुळे या वन्यप्राण्यांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे़
धारणी तालुक्यात असलेल्या १९तलावापैकी केवळ चार तलावात २० टक्के पाणीसाठा आहेत़ दुसऱ्या क्रमांकाचे तिवसा तालुक्यात असलेल्या ११ तलावांपैकी ३ तलावांत एक मीटर जलसाठा आहे़ अमरावती,अचलपूर, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील प्रत्येकी पाच तलावांतील पाणीसाठा संपला तर चांदूर बाजार मोर्शी या तालुक्यातील प्रत्येकी तीन लघुसिंचन तलावात केवळ दिड टक्के जलसाठा वरूड तालुक्यातील सहा लघुसिंचन तलावाची हीच स्थिती असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिलीत़ (तालुका प्रतिनिधी)
तापमानवाढ कारणीभूत
तलावांमध्ये पाणीसंचय पातळी कमी असते. त्यातच गेल्या दोन आठवड्यांपासून दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे तलावांची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. बहुतांश तलावांत केवळ मृतसाठाच शिल्लक आहे.