आठ विधानसभा क्षेत्रांत वाढले ५२ हजार मतदार
By Admin | Updated: July 30, 2014 23:46 IST2014-07-30T23:46:48+5:302014-07-30T23:46:48+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनर्निरीक्षण व नवीन मतदार नोंदणी अभियान ९ जून ते ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येत आहे. निवडणूक विभागाच्या मोहिमेला जिल्ह्यात व्यापक

आठ विधानसभा क्षेत्रांत वाढले ५२ हजार मतदार
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनर्निरीक्षण व नवीन मतदार नोंदणी अभियान ९ जून ते ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येत आहे. निवडणूक विभागाच्या मोहिमेला जिल्ह्यात व्यापक प्रतिसाद लाभला. यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघांत ५१ हजार ८२६ मतदार वाढले आहेत.
लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे हजारो मतदारांना त्यांचा घटनात्मक अधिकार बजावता आला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग आले. जिल्हाधिकाऱ्यांपासून निवडणूक आयोगापर्यंत याविषयीच्या तक्रारी झाल्या. यासर्व प्रकाराची आयोगाने गंभीर दखल घेतली. अशा सर्व मतदारांना तसेच नवीन मतदारांना नाव नोंदणी करण्याची पुन्हा संधी देण्यात आली. जिल्हा निवडणूक विभागाकडे तक्रारी करणाऱ्या ११५० तक्रारकर्त्यांच्या मोबाईलवर निवडणूक विभागाद्वारे थेट संपर्क साधून त्यांना मतदार यादीत नाव नोंदणीचा नमुना ६ देखील देण्यात आला. तसेच मतदार नाव नोंदणीसाठी जिल्ह्यात ‘स्विप’ उपक्रमांतर्गत प्रचार, प्रसार व जनजागृती करण्यात आली. तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेदरम्यान मतदार नाव नोंदणीचे अर्ज पुरविण्यात आले. परिणामस्वरूप जिल्ह्यात ५१ हजारांवर मतदार वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली आहे, असे दिसते. (प्रतिनिधी)