५२ शाळा डिजिटायझेशनच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:17+5:30
मेळघाटात धारणी तालुक्यातील २६ व चिखलदरा तालुक्यातील २६ अशा एकूण ५२ शाळा डिजिटल शाळा प्रकल्पाकरिता निवडल्या गेल्या. यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह काही खाजगी शाळांचा समावेश केला गेला. यात आश्रमाशाळांनाही सहभागी करून घेतले गेले.

५२ शाळा डिजिटायझेशनच्या प्रतीक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाटातील ५२ शाळा डिजिटाझेशनच्या प्रतीक्षेत आहे. या शाळांकरिता आलेला डिजिटल शाळा प्रकल्प मागील १६ महिन्यांपासून प्रशासनाकडून दुर्लक्षित आहे.
मेळघाटात धारणी तालुक्यातील २६ व चिखलदरा तालुक्यातील २६ अशा एकूण ५२ शाळा डिजिटल शाळा प्रकल्पाकरिता निवडल्या गेल्या. यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह काही खाजगी शाळांचा समावेश केला गेला. यात आश्रमाशाळांनाही सहभागी करून घेतले गेले.
औरंगाबाद स्थित मानव विकास आयुक्तांनी अमरावती जिल्हा मानव विकास समितीला हा डिजिटल शाळा प्रकल्प आॅक्टोबर २०१८ ला दिला. मानव विकास कार्यक्रमांतर्गत ७९ लाखांचे अनुदानही पाठविले गेले. पण, हे अनुदान आजही अखर्चित आहे. या निधीतूनच ५२ शाळांचे डिजिटाझेशन करून मेळघाटातील शिक्षणाला नवी दिशा देणे अपेक्षित होते. पण, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा प्रकल्पच फाइलबंद ठेवण्यात आला आहे.याला जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माध्यमिक शिक्षण विभाग तेवढाच जबाबदार आहे. यात मेळघाटातील विजेचा प्रश्न पुढे करीत प्रशासन स्वत:ला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. खरे तर मार्च २०१९ पर्यंतच निधी खर्च करून मेळघाटात हा प्रकल्प कार्यान्वित करणे गरजेचे होते.
डिजिटल शाळा प्रकल्पांतर्गत धारणी तालुक्यात लवादा, गोंडवाडी, ढाकरमल, हरिसाल, भोकरबर्डी, सुसर्दा, बिजूधावडी, कुटंगा, टिटंबा, टेंबली, राणीगाव, चाकर्दा, साद्राबाडी, खापरखेडा दहिंडा, सावलीखेडा, सुसर्दा, हरिसाल, बैरागड, शिरपूर, रत्नापूर, चाकर्दा येथील शाळांचा समावेश आहे. चिखलदरा शहरातील गिरिजन विद्यालय, दीपशिखा गुरुकुल सैनिकी शाळेसह तालुक्यातील डोमा, टेंबु्रसोडा, जारिदा, सेमाडोह, गौलखेडा, काटकुंभ, मोरगड, आडनद, चुर्णी, सोनापूर, बोराळा, बामादेही, दहेंद्री, नागापूर, जामली, सलोना, हतरू, बनापूर, बदनापूर, जामली येथील शाळांसह सलोना येथील दोन शाळांचा समावेश आहे. आज या सर्व शाळा, डिजिटायझेशनच्या प्रतीक्षेत आहेत.