अमरावतीला ५१ स्वातंत्र्यवीरांनी भोगला होता कारावास; कारागृहात स्मृतींचे जतन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 13:09 IST2024-08-16T13:08:09+5:302024-08-16T13:09:09+5:30
स्वातंत्र्य दिन विशेष : माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी, शिवाजीराव पटवर्धन

51 freedom fighters were imprisoned in Amravati; Preservation of memory in prison
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशाचा ७७वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले.. स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र सेनानींनी कारावास भोगला, त्यांच्या आठवणी, स्मृती आजही भारतीयांच्या मनावर कोरल्या आहेत. येथील मध्यवर्ती कारागृहात १९३० ते १९४४ या काळात ५१ स्वातंत्र्य सेनानींनी कारावास भोगला. यात माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी, शिवाजीराव पटवर्धन यांचाही समावेश होता.
ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वधर्मीयांनी लढा दिला. ९ ऑगस्ट १९४२च्या 'चलो जाव'च्या संदेशानंतर स्वातंत्र्यलढ्याचे रान पेटले. देशवासी रस्त्यावर उतरले. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींना ब्रिटिशांनी तुरुंगात डांबले. ज्या तुरुंगात त्यांना कारावास भोगावा लागला, तेथील बराकीत आजही स्वातंत्र्याच्या लढ्याला उजाळा दिला जातो. अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक-दोन नव्हे, तर तब्बल ५१ जणांना कारावास झाला होता. स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींचे जतन, संरक्षण कारागृह प्रशासन आजही करते. स्वातंत्र्य दिन, शहीद दिन आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या स्मृतिस्थळाची पूजाअर्चा करून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले जाते. १५ ऑगस्ट रोजी त्याअनुषंगाने कारागृह प्रशासनाची तयारी सुरु आहे.
या स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश पल्लम राजू, के. आर. कारंथ, के. पी.
एम. अग्नेश्वरिया, सी. एन. एम. मुदलियार, आर. नायडू, एम. अप्पलस्वामी, पी. गणपधीराव, के. कलेस्वामी राव, आर. सी. भारती, सी. चट्टेयार, के. के. रेड्डी, एम. बी. नायडू, एम. अनंतशध्यानम अय्यंगार, के. कलप्पा, के. ए. दामोदर मेनन, ए. कुप्परस्वामी मुदलियार, ए. पिल्लाई, एस. एस. कुलकर्णी, व्ही. व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी, एस. सत्यमूर्ती, के. कामराज, एम. भक्तवत्सलम्, आर. राघवमेनन, व्ही. राघवैया, टी. विश्वनाथन, कला व्यंकटराव, पी. सीवरनानन, लक्ष्मीनारायण मालाणी, सीताराम जाजू, पार्वतीबाई पटवर्धन, रघुनाथमल कोचर, वीर वामनराव जोशी, यासह अन्य स्वातंत्र सैनिकांची नावे स्मृतिस्तंभावर कोरली आहेत.
"दरवर्षी दिन, औचित्य साधून येथे पूजाअर्चा करून स्मृती जागविल्या जातात. या बराकी स्वातंत्र्यलढ्यानिमित्त आजही 'जैसे थे' आहेत. बराकीचे नूतनीकरणाची कामे होत आहे."
- कीर्ती चिंतामणी, अधीक्षक, अमरावती मध्यवर्ती कारागृह