उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ५० रुपये; तलाठी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 13:28 IST2024-07-03T13:27:24+5:302024-07-03T13:28:03+5:30
Amravati : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, गुन्हे दाखल होणार

Majhi Ladki Bahin Yojana
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला देण्याकरिता प्रत्येक ५० रुपये मागणाऱ्या सावंगी येथील तलाठ्याला अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले. या प्रकरणात निलंबनाची कारवाई ही राज्यातील बहुधा पहिलीच आहे.
योजनेच्या कागदपत्राकरिता १ जुलैपासून महिलांची गर्दी ओसंडून वाहू लागली. त्याचा फायदा सावंगी येथील तलाठी तुळशीराम महादेव कंठाळे (५५) याने प्रत्येकी ५० रुपये घेऊन उत्पन्नाचा दाखला दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तत्काळ तहसीलदारांना अहवाल मागितला. मंगळवारी दुपारी पत्र परिषद घेऊन तडकाफडकी निलंबित करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
तुळशीराम कंठाळे हा महिलांकडून उत्पन्नाच्या दाखल्याचे ५० रुपये घेत असल्याचा व्हिडीओ एका जागरूक तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केला. पुसला मंडळ अधिकारी संजय मिराशे यांच्याकडून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू होती. निलंबित तलाठी कंठाळे यांना धारणी तहसील कार्यालय मुख्यालयी जाण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी तीन निलंबन अन् १६ कारणे दाखवा नोटीस
तुळशीराम कंठाळे वादग्रस्त तलाठी असून यापूर्वी अंजनगाव सुर्जी, वरूड आणि मोर्शी येथून निलंबित झाले होते. याशिवाय नागरिकांच्या तक्रारीवरून तहसील कार्यालयाकडून १६ वेळा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेकरिता तलाठी किंवा दलाल आर्थिक पिळवणूक करीत असतील, तर तत्काळ तहसील कार्यालयात माहिती द्यावी. सेतू केंद्रावर शासकीय दराप्रमाणे पैसे द्यावे.
- पंकज चव्हाण, प्रभारी तहसीलदार, वरूड