आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करून ५ लाखांची फसवणूक
By प्रदीप भाकरे | Updated: August 23, 2023 17:03 IST2023-08-23T17:03:31+5:302023-08-23T17:03:39+5:30
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करून ५ लाखांची फसवणूक
अमरावती : आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करणाऱ्या एका भामट्याने येथील एका प्रतिष्ठितला सुमारे ४ लाख ७८ हजार ६२० रुपयांनी ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी त्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून आलेल्या तक्रारीनुसार शहर आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याने २२ ऑगस्ट रोजी अज्ञात दोन मोबाइल यूजर विरुद्ध फसवणूक व आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११.२२ दरम्यान फसवणुकीची ती घटना घडली.
तक्रारीनुसार, दोन मोबाइल यूजर्सनी फिर्यादी यांना फोन कॉल व व्हॉट्सॲप व व्हिडिओ कॉल करुन बोलण्यामध्ये गुंतवून ठेवले. संबंधित आरोपीने तो आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी केली. एका आर्मी जवानाचे मेडिकल करावयाचे असल्याचे सांगून व त्याचे ॲडव्हान्स पेमेंट करणार असल्याची बतावणी देखील केली. त्याच मालिकेत आरोपींनी फिर्यादीच्या एका बँकेच्या मोबाइल ॲपमधून क्रमाक्रमाने पाच वेळा एकूण ४ लाख ७८ हजार ६२० रुपये परस्पर वळविले. अवघ्या दीड तासात ती आर्थिक फसवणूक झाली. नाडविल्या गेलेल्या त्या प्रतिष्ठित व्यक्तीने अखेर सायबर पोलिस ठाणे गाठले. सायबर पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी रात्री ८.२० च्या सुमारास त्यांची तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.