४७७ शेतकरी सोयाबीन अनुदानास अपात्र
By Admin | Updated: May 1, 2017 00:15 IST2017-05-01T00:15:50+5:302017-05-01T00:15:50+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील जवळपास ४७७ शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदानापासून अपात्र ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

४७७ शेतकरी सोयाबीन अनुदानास अपात्र
‘म्हणे मुलाने आणला शेतमाल’ : शेतकरी बचाव समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
परतवाडा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील जवळपास ४७७ शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदानापासून अपात्र ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविरुद्ध शेतकरी बचाव समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन न्याय मागण्यात आला आहे.
अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये विकलेला सोयाबीन सरकारतर्फे प्रति क्विंटल दोनशे रूपये किमान २५ क्विंटलपर्यंत जाहीर करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केल्याच्या पावत्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अर्जासोबत जमा केल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील २१५५ शेतकऱ्यांपैकी १६७८ शेतकऱ्यांना पात्र करून २८ हजार क्विंटल सोयाबीन मागे त्यांना ५६ लक्ष रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले तर ४७७ शेतकऱ्यांना अपात्र घोषित करून त्यांना प्रत्येकी दोनशे रुपये क्विंटल मागील अनुदानापासून अपात्र ठेवण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
समितीने केला अन्याय
सोयाबीन विक्रीसाठी आणताना ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे, त्याच शेतकऱ्याने तो आणायला पाहिजे होता. मात्र वडिलांच्या नावावर शेत असेल तर मुलाने, पत्नीने सोयाबीन विकायला आणला व पावतीवर त्यांचे नाव असण्यासोबत हिशेब पट्टीवरसुद्धा दुसऱ्याचेच नाव असल्याच्या कारणावरून अनुदानापासून अपात्र करण्यात आल्याचा नियम लावण्यात आला. याविरुद्ध शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती देवेंद्र पेटकर, तुळशीदास अपाले, सचिव राहुल गाठेसह आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लाभ देण्याची मागणी केली आहे. शासनाकडून अनुदान देय असताना समितीने अन्याय केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
त्रिसदस्यीय समिती
सोयाबीन अनुदानासाठी सहा. उपनिबंधक, लेखापरीक्षक आणि बाजार समितीचे सचिव अशी त्रिसदस्यीय समिती तयार करण्यात आली होती. सदर समितीला सोयाबीन अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी काही निकष देण्यात आले होते. त्यानुसार या समितीने शेतकऱ्यांना अपात्र घोषित केले.
सोयाबीन उत्पादकांनी स्वत:च्या नावाने कागदपत्रे सादर केली अशांनाच त्री-सदस्यीय समितीच्या निकषानुसार पात्र केले. मात्र सातबारा नसलेले ४७७ लाभार्थी अपात्र करण्यात आले आहे.
- मंगेश भेटाळू, सचिव, बाजार समिती, अचलपूर