महापालिकेतील ४७ शिक्षकांवर कारवाई होणार
By Admin | Updated: June 5, 2015 00:32 IST2015-06-05T00:32:42+5:302015-06-05T00:32:42+5:30
नियमित वेतनाच्या मागणीसाठी २५ मार्च २०१५ रोजी महापालिका शाळांमधील शिक्षकांनी विनापरवानगी काढलेल्या मोर्चाप्रकरणी ४७ शिक्षकांवर ...

महापालिकेतील ४७ शिक्षकांवर कारवाई होणार
आयुक्तांची प्रतीक्षा : मोर्चा काढणे भोवले, फाईल मंजूर
अमरावती : नियमित वेतनाच्या मागणीसाठी २५ मार्च २०१५ रोजी महापालिका शाळांमधील शिक्षकांनी विनापरवानगी काढलेल्या मोर्चाप्रकरणी ४७ शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. याविषयीची फाईल मंजूर करण्यात आली असून आयुक्त चंद्रकांत गुडेवार रजेवरुन परतताच शिक्षकांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.
तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कार्यकाळात वेतनासाठी शिक्षकांनी मोर्चा काढला होता. परंतु या मोर्चाला प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. तरीदेखील शिक्षकांनी मोर्चा काढून मागणी रेटून धरली. त्यावेळी आयुक्तांनी मोर्चेकरी शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी अरुणा डांगे यांना मोर्चेकरी शिक्षकांची शाळानिहाय यादी तयार करण्याच्या सूचना तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिल्या होत्या.
नियमानुसार प्रस्तावित कारवाईचे असे आहे स्वरूप
विनापरवानगी मोर्चा अथवा संप पुकारल्यास सेवा शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकांवर कारवाई कोणती करावी,हे अधिकार आयुक्तांना आहेत. यात तीन वेतनवाढ रोखणे, वेतनकपात, निलंबन, सेवा समाप्ती, बडतर्फ करणे, पदावनत करणे आदींचा समावेश आहे.
मोर्चेकरी शिक्षकांवर कारवाई करण्याला मंजुरी मिळाली आहे. कारवाईची रुपरेषा अद्याप निश्चित नाही. परंतु आयुक्त गुडेवार यांनी कारवाई करण्याचे ठरविल्याने तेच याबाबतचा पुढील निर्णय घेतील.
-प्रवीण पाटील,
शाळा निरिक्षक, महापालिका.
आयुक्तांकडून होणारी कारवाई पाहूनच शिक्षकांची पुढची भूमिका ठरविली जाईल. शिक्षकांनी न्याय्य मागणीसाठी आंदोलन केले. त्यामुळे यात गैर काहीही नाही.
-गोपाल कांबळे, अध्यक्ष,म.रा.प्राथमिक
शिक्षक संघटना.