पीक विम्याला मुकले ४५ हजार शेतकरी

By Admin | Updated: July 12, 2014 00:37 IST2014-07-12T00:37:10+5:302014-07-12T00:37:10+5:30

हवामानावर आधारित पीक विमा योजनेला मागील हंगामात १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती.

45,000 farmers died due to crop insurance | पीक विम्याला मुकले ४५ हजार शेतकरी

पीक विम्याला मुकले ४५ हजार शेतकरी

गजानन मोहोड अमरावती
हवामानावर आधारित पीक विमा योजनेला मागील हंगामात १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. यंदा, मात्र जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यातील ९० टक्के क्षेत्रात अद्याप पेरणी व्हावयाची आहे. अशा स्थितीत ही पीक विमा योजना शासनाने गुंडाळली आहे. या योजनेला जुलै २०१४ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालयाने कृषी आयुक्तांकडे सादर केला होता. परंतु तरीही मुदतवाढ नाकारली गेली. त्यामुळे हजारोे शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले.
पावसाचा लहरीपणा, नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण, अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या हवामान घटकांच्या तीन धोक्यांपासून संरक्षण देणारी ही योजना होती. जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात अधिसूचित महसूल मंडळस्तरावर क्षेत्र घटकांना गृहित धरून ही योजना राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. या योजनेची मुदत ३० जून निर्धारित होती. परंतु कृषी आयुक्त कार्यालयाने मुदतवाढ दिली नाही.
योजनेचा ‘ट्रीगर’ कमी पर्जन्यमान
हवामानावर आधारित पीक विमा योजनेचा ट्रीगर कमी पर्जन्यमान हा आहे. नेमके यावर्षी खरिपाच्या हंगामात ४० दिवसांत केवळ दोन दिवस पाऊस पडला. योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली असती तर लाखो शेतकऱ्यांना योजनेच्या पहिल्या टप्प्यात ८० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे १० मि.मी. पर्जन्यमानासाठी २७५ रुपये या परिमाणानुुसार प्रतीहेक्टर २२०० रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली असती.
जिल्ह्यात बँकांचे ४५ हजार ३६० कर्जदार सभासद
हवामानावर आधारित पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची करण्यात आली होती. जिल्हा सहकारी बँकेसह इतर सर्व बँकांचे ४५,३६० कर्जदार सभासद आहेत. या सर्व शेतकऱ्यांना योजना सक्तीची होती. प्रत्यक्षात योजनेची मुदत ३० जून रोजी संपली, तेव्हा या शेतकऱ्यांची पेरणी व्हायची होती. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. परिणामी सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही.

Web Title: 45,000 farmers died due to crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.