पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 19:47 IST2020-06-03T19:47:41+5:302020-06-03T19:47:48+5:30
त्या कारणाने यंदा विदर्भातही १० जूननंतर दमदार पावसाची आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला.

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा
संदीप मानकर
अमरावती- पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत जलसंपदा विभागाने घेतलेल्या २ जूनपर्यंतच्या अहवालानुसार सरासरी ४०.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याकारणाने यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा १ जून रोजी मान्सून केरळमध्ये पोहचला आणि स्थिरस्थावर झाला. त्या कारणाने यंदा विदर्भातही १० जूननंतर दमदार पावसाची आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया उर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात ४८.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३०.०२ टक्के, अरुणावती सर्वात कमी ९.७८ टक्के, बेंबळा प्रकल्पात सर्वाधिक ५४.९० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ४०.०५ टक्के, वान ४४.५५ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ४९.३९ टक्के, पेनटाकळी ४१.८२ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात १६.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा १३९९.९१ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ५६५.१८ दलघमी असल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली.
२४ मध्यम प्रकल्पांत फक्त ३५ टक्केच पाणीसाठा
मोठ्या प्रकल्पाच्या तुलनेत २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी फक्त ३५.२८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु पावसाळा दोन आठवड्यावर येऊन ठेपल्याने यंदा प्रकल्प पुन्हा शंभर टक्के भरतील अशी अपेक्षा आहे. गत वर्षी बहुतांश प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्याकारणाने प्रकल्पातून रबीला सिंचनाकरिता पाणी देता आले. ४७७ लघु प्रकल्पांत मात्र २०.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून पाचही जिल्ह्यांतील एकूण ५११ प्रकल्पांत सरासरी ३२.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची नोंद सिंचन विभागाने घेतली आहे.