३२० कोटींचे नुकसान
By Admin | Updated: July 30, 2016 23:54 IST2016-07-30T23:54:02+5:302016-07-30T23:54:02+5:30
जुलै महिन्यात सतत पाऊस, झडसदृश स्थिती व अतिवृष्टी यामुळे एक लाख हेक्टरवरील तुरीचे पीक जागीच जळाले आहे.

३२० कोटींचे नुकसान
तूर पिकावर ‘मर’ : सर्वेक्षणाला सुरुवात, मदत केव्हा ?
अमरावती : जुलै महिन्यात सतत पाऊस, झडसदृश स्थिती व अतिवृष्टी यामुळे एक लाख हेक्टरवरील तुरीचे पीक जागीच जळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे किमान ३२० कोटी रुपयांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर कृषी विभागाद्वारा सर्वेक्षण करीत आहे. शेतकऱ्यांना मात्र शासन मदतीची अपेक्षा आहे.
यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६३ टक्के अधिक पाऊस पडला. सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली आहे. २७ जूननंतर महिनाभर सतत पाऊस होत आहे. सुरुवातीला हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी पोषक होता. यानंतर पिकांच्या नुकसानीस कारणीभूत होत आहे. या पावसाने तूर व कपाशी पिकावर ‘मर’ रोगाचा प्रादूर्भाव झालेला आहे. झडसदृश्य स्थितीमध्ये कपाशीवर ‘आकस्मित मर’ रोगाचे आक्रमण झाले. शेतात अनेक खोलगट भागातील कपाशी रोपे जागीच मृत झाली. या संकटातून शेतकरी सावरत नाही. तोच पुन्हा संततधार पावसाने तुरीचे पीक जागीच जळाली आहे. पाण्याचा निचरा न होणाऱ्या काळ्या जमिनीत तूर पिकांची दैना झालेली आहे. शेतकऱ्यांना याविषयीची माहिती देणे गरजेचे असतांना कृषी विभागाचे वराती मागून घोडे आहे.
शेतात चर कसा काढावा या विषयीची तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना देणे अपेक्षित असतांना या विभागाद्वारा मात्र पेरणीपूर्व बीज प्रक्रिया कशी करावी, या विषयीची माहिती शिबिराद्वारे शेतकऱ्यांना दिली, असे पटवून सांगत आहे. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्यात येऊन शासनाने मदत करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. जिल्ह्यात १ जून ते ३० जुलैदरम्यान ४१३.५ मि. मी. पावसाची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ६३०.३ मि. मी. पाऊस जिल्ह्यात पडला आहे. ही १५२.४ टक्केवारी आहे. सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली आहे.त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)
असे आहे नुकसान
जिल्ह्यात तूर पिकासाठी १ लाख १४ हजार १९५ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ३१ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. ही ११५ टक्केवारी आहे. यापैकी किमान १ लाख एकरामध्ये तुरीचे पीक जळाले आहे. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे एकरी ४ पोेते उत्पन्न गृहीत धरले तर ८ हजार रुपये प्रतिक्विंटल या भावाने शेतकऱ्यांनी किमान ३२० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे.
कृषी विभागाने मागविले नुकसानीचे अहवाल
जिल्ह्यात अतिपावसाने १ लाखावर एकरातील तूर पीक नष्ट झाले. या शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध वृत्तानंतर कृषी विभागाने गावपातळीवर सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक तूर पिकाची पाहणी करीत आहे.
शेतात चर काढण्याचे प्रात्यक्षिक हवे
हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्यामुळे बहुतांश शेतात पाणी साचणार व पिकांचे नुकसान होणार हे गृहित धरून शेतकऱ्यांना चर काढून शेतामधील पाणी काढण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहाय्यकांनी देणे गरजेचे आहे. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या अतिपावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
तूर पिकाच्या नुकसानीबाबत सर्वेक्षण करून अहवाल मागितला आहे. पिकाला आळवणी करणे गरजेचे आहे. शेतात चर काढून पाणी बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिजप्रक्रिया कॅम्पच्या वेळी याविषयी शेतकऱ्यांना सूचना केलेल्या आहेत.
- दत्तात्रय मुळे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी