मध्य रेल्वे मुंबई विभागात तिकीट तपासणीतून ३०३ कोटींचा महसूल मिळाला
By गणेश वासनिक | Updated: July 10, 2023 19:34 IST2023-07-10T19:33:58+5:302023-07-10T19:34:07+5:30
मध्य रेल्वे मुंबई विभागात तिकीट तपासणीतून ३०३ कोटींचा महसूल मिळाला आहे.

मध्य रेल्वे मुंबई विभागात तिकीट तपासणीतून ३०३ कोटींचा महसूल मिळाला
अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागात तिकीट तपासणीतून ३०३ कोटींचा महसूल मिळाला आहे. सन २०२२-२०२३ आर्थिक वर्षात ४६ लाख ८६ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून पहिल्यांदाच जूनपर्यंत ४१.५० टक्के महसूल उत्पन्नात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
तिकीट तपासणी महसुलात मध्य रेल्वेने उद्दिष्ट २३५ कोटी ५० लाख एवढे आहे. मात्र, ३०३ कोटी ही लक्षणीय वाढ ठरली असून, कोणत्याही विभागीय रेल्वेने हा टप्पा गाठण्याची पहिलीच वेळ आहे. चालू आर्थिक वर्षात जून २०२३ पर्यंत मध्य रेल्वेने १३,३३९.५५ हजार प्रकरणे नोंदविली आहेत आणि १०७६.२५ हजार प्रकरणांच्या उद्दिष्टाविरुद्ध ९४.०४ कोटी कमावले आहेत. अनुक्रमे ६६४९.२५ कोटी अशा प्रकारे प्रकरणांमध्ये २५.५१ टक्के आणि महसुलात ४१.४२ टक्क्याने उद्दिष्ट पार केले.
रेल्वे दंडाधिकाऱ्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, भुसावळ, मनमाड, खंडवा, नागपूर, दौंड आणि पुणे या विविध रेल्वेस्थानकांवर रेल्वे दंडाधिकारी नियुक्त केले जातात. दंडाधिकारी पथक म्हणून संलग्न तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचारी हे रेल्वे दंडाधिकाऱ्यांच्या सोबत कर्तव्य बजावतात. धावत्या गाड्यांमध्ये आणि रेल्वेस्थानकांवर तपासणी करून फुकट्या प्रवाशांकडून दंडात्मक शुल्क आकारून ते महसूल म्हणून गोळा करतात, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली.