३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना मदतनिधीच्या १६१ कोटींची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:29+5:302021-01-08T04:36:29+5:30
अमरावती : जिल्ह्यात यंदा ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस, अतिवृष्टीमुळे ३ लाख ५४ हजार ८५२ शेतकऱ्यांच्या ...

३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना मदतनिधीच्या १६१ कोटींची प्रतीक्षा
अमरावती : जिल्ह्यात यंदा ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस, अतिवृष्टीमुळे ३ लाख ५४ हजार ८५२ शेतकऱ्यांच्या ३ लाख १४ हजार ६८९ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी पहिल्या टप्प्यात १६१ कोटी १० लाख ७३ हजारांचा मदतनिधी शेतकऱ्यांना देण्यात आले. प्रत्यक्ष मागणीच्या ५० टक्के असल्याने दुसऱ्या टप्प्यातील १६१ कोटींच्या मदतनिधीची शासनाला प्रतीक्षा आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला रोहीणी नक्षत्रात दमदार पाऊस झाल्यानंतर जूनच्या १० तारखेनंतर जिल्ह्यात पेरणीला जोर धरला. मात्र, नंतर पावसात खंड पडला. यासोबतच बियाणे कंपन्यांद्वारा उगवणशक्ती नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आल्याने जिल्ह्यात ५० हजारावर हेक्टरमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढावले. या सर्व प्रकारात ६० दिवसांच्या अवधितले मूग व उडीद आदी पिके पावसाअभावी बाद झालीत.
ऑगस्ट महिन्यापासून पावसाने पुन्हा जोर धरला. पावसाची रिपरीप ही ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होती. यामध्ये सोयाबीनचा काढणीचा हंगाम असल्याने गंजी लावलेले सोयाबीन खराब झाले तर जमिनीत जास्त आर्द्रता व सततचा पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे शेतातील उभे सोयाबीन उद्ध्वस्त झाले. अतिवृष्टीने सोयाबीन जाग्यावर सडले, प्रतवारी खराब झाली. सोयाबीनच्या सरासरी उत्पादनात ५० ते ७० टक्क्यांनी कमी आलेली आहे.
याशिवाय सततचा पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर बुरशीजन्य रोगांचा अटॅक झाला या बोंडसडमुळे ८० टक्के क्षेत्रात नुकसान झाले. याशिवाय गुलाबी बोंडअळीचा अटॅक आदीमुळे कपाशीच्या सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांवर घट झाली. पावसाने बाधित झालेल्या पिकांचे संयुक्त सर्वेक्षण करण्यात येऊ, प्रचलित निकषापेक्षा जास्त मदतनिधी शासनाने मंजूर् केला परंतू त्याचे मदतनिधीचा पहिलाच टप्पा जिल्ह्यास प्राप्त झाला दुसऱ्या टप्प्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
पाईंटर
मदतीसाठी एकूण निधीची मागणी : १६१.१० लाख
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी : ३,५४,८५२
मदतीचा लाभ भेटलेले शेतकरी : ३,४५,६९५
मदतीच्या प्रतिक्षेत शेतकरी : ९०५७
कोट
पावसाने २५ एकरातील सोयाबीन उद्ध्वस्त झाले. उत्पादन खर्चही निघालेला नाही. कृषी विभागाद्वारा पंचनामे करण्यात आले. मिळालेला मदतनिधी तोकडा आहे. दुसरा टप्प्याचा मदतनिधी अजूनही मिळालेला नाही.
- सतीश ईश्वरकर, शेतकरी, हिरापूर
कोट
शासनादेशानुसार संयुक्त सवेर्क्षणांती प्राप्त मदतनिधी प्रत्येक शेतकऱ्यांना ५० टक्के प्रमाणात त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील निधीची मागणी करण्यात आलेली आहे.
- नितीन व्यवहारे,
निवासी उपजिल्हाधिकारी.