आज निवडले जाणार २९ वे अध्यक्ष
By Admin | Updated: September 20, 2014 23:40 IST2014-09-20T23:40:38+5:302014-09-20T23:40:38+5:30
जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष-उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी शनिवार २० सप्टेंबर रोजी संपुष्टात आला. त्यामुळे नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव

आज निवडले जाणार २९ वे अध्यक्ष
जिल्हा परिषद : हात उंचावून होणार मतदान
अमरावती : जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष-उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी शनिवार २० सप्टेंबर रोजी संपुष्टात आला. त्यामुळे नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीसाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या निवडणुकीमुळे एकूूणच राजकारणाची दिशा निश्चित होणार असल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे. उर्वरित अडीच वर्षांकरिता अध्यक्षपद अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे. रविवार २१ सप्टेंबर रोजी उपरोक्त पदांसाठी निवडणूक होत असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात राहणार आहे.
असा राहणार निवडणूक कार्यक्रम
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी २१ सप्टेंंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारणे, दुपारी ३ वाजता उमेदवारी दाखल करणाऱ्यांच्या यादीचे वाचन व छाननी केली जाईल. त्यानंतर लगेच १५ मिनिटांचा अवधी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात येईल. ही वेळ संपताच उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांची व निवडणूक लढणाऱ्यांची नावे वाचून दाखविली जाईल. त्यानंतर गरज भासल्यास मतदान प्रक्रिया पार पडेल. यामध्ये प्रथम अध्यक्षपदासाठी आणि त्यानंतर उपाध्यक्षपदाकरिता ही प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.