सहा महिन्यांपासून डायलिसिसवर असलेल्या मुलाला आईकडून पुनर्जन्म
By उज्वल भालेकर | Updated: August 19, 2023 18:12 IST2023-08-19T18:11:00+5:302023-08-19T18:12:07+5:30
‘सुपर’मध्ये २७वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

सहा महिन्यांपासून डायलिसिसवर असलेल्या मुलाला आईकडून पुनर्जन्म
अमरावती : स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे २७वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण करण्यात आली. सहा महिन्यांपासून डायलिसिसवर असलेल्या मुलाला आईने किडनीदान करून पुनर्जन्म दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी येथील रहिवासी अनिल एकनाथ सातंगे (४१) यांच्या दोन्ही किडनी खराब झाल्याने मागील सहा महिन्यांपासून ते डायलिसिस उपचार घेत होते. परंतु आपल्या मुलाला होणारा त्रास पाहून त्यांची आई यमुनाबाई एकनाथ सातंगे (६२) यांनी आपल्या मुलाला किडनीदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी नेफरोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण वागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. जफर अली, डॉ. नंदिनी देशपांडे, डॉ. अंजू दामोदर यांनी ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
यावेळी किडनी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे यांनी महात्मा फुले योजनेंतर्गत शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी आवश्यक मदत केली. तसेच यावेळी परिचारिका अनिता तायडे, सरला राऊत, तेजल बोंडगे, नीलिमा तायडे, तेजस्विनी वानखडे, अभिषेक नीचत, विजय गवई, जमुना मावस्कर, प्राजक्ता देशमुख, अनिता खोब्रागडे, योगिनी पडोळे, भारती घुसे, निकिता लोणारे, रेखा विश्वकर्मा, सुजाता इंगळे, श्रीधर डेंगे, औषध विभागामधील हेमंत बनसोड, नीलेश ठाकरे, अंजली दहात आहारतज्ज्ञ, अमोल वाडेकर, पंकज पिहूलकर, गजनान मातकर, अविनाश राठोड यांनीही शस्त्रक्रियेसाठी मदत केली.