दोन दिवसांत २५ हजार नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:53+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी अशा दोन विभागांमध्ये नागरिकांकडून आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यासाठी २ ते ६ एप्रिल दरम्यान ही मोहीम राबविली जात आहे. अमरावती महानगरात गुरुवारी १४ पथकांद्वारे केलेल्या तपासणीत सुमारे आठ हजार नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्यात. यात सर्दी, खोकला, ताप व श्वसनाच्या त्रासाची नोंदणी केली जात आहे.

दोन दिवसांत २५ हजार नागरिकांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशान्वये ‘अमरावतीकर, मात करूया कारोनावर’ या गुरुवारपासून प्रारंभ झालेल्या विशेष मोहिमेत दोन दिवसांत २५ हजार २९४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात सर्दी, खोकला, ताप व श्वसनाचा त्रास असल्याबाबत नोंदणी करण्यात येत आहे. महापालिकेचे आरोग्य पथक हे सकाळी ८ ते १२ दरम्यान नागरिकांच्या दारी पोहोचून एका प्रपत्रात ही माहिती गोळा करीत आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी अशा दोन विभागांमध्ये नागरिकांकडून आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यासाठी २ ते ६ एप्रिल दरम्यान ही मोहीम राबविली जात आहे. अमरावती महानगरात गुरुवारी १४ पथकांद्वारे केलेल्या तपासणीत सुमारे आठ हजार नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्यात. यात सर्दी, खोकला, ताप व श्वसनाच्या त्रासाची नोंदणी केली जात आहे. गुरुवारी ७९३१ व शुक्रवारी २१ आरोग्य पथकांद्वारे १७ हजार ३६३ नागरिकांची शहरात तपासणी करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाने बाधित नेमकी नागरिकांची संख्या किती, हे तपासणी अहवालाअंती ६ एप्रिलनंतरच स्पष्ट होणार आहे. शहरातील नागरिकांची विशेष तपासणी मोहीम वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, स्वच्छता विभागप्रमुख डॉ. सीमा नैताम, समाजविकास अधिकारी धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे.
पाच सदस्यांकडून तपासणी
अमरावती व बडनेरा शहरात एकाच वेळी नागरिकांची विशेष तपासणी मोहीम राबविली जात आहे. एका पथकात पाच सदस्य आहेत. ते नागरिकांंसोबत चर्चा करताना सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास आहे का, अशी विचारणा करीत आहेत. या पथकात डॉक्टर, पोलीस, आशा वर्कर आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे.
आशा वर्कर आघाडीवर
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात प्रारंभ झालेल्या नागरिकांच्या विशेष तपासणी मोहिमेत आशा वर्कर आघाडीवर आहेत. दारावर पोहोचताच नागरिकांच्या आजाराबाबतची माहिती आशा वर्कर गोळा करून शिक्षकांना नोंदी घेण्यासाठी मदत करतात. पथकातील डॉक्टर, दोन शिक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी त्यांचा समन्वय असल्याचे चित्र आहे.
पहिल्या दिवशी नागरिकांची विशेष तपासणी मोहीम राबविताना थोडाफार त्रास झाला. मात्र, शुक्रवारी बहुतांश भागात आरोग्य पथकाला सहकार्य करून नागरिकांनी माहिती दिली. पुढे ६ एप्रिलपर्यंत असेच सहकार्य नागरिकांकडून अपेक्षित आहे. ही विशेष तपासणी मोहीम नागरिकांच्या हितासाठीच आहे.
- प्रशांत रोडे,
आयुक्त, महापालिका.