शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत!

By Admin | Updated: July 21, 2014 23:37 IST2014-07-21T23:37:37+5:302014-07-21T23:37:37+5:30

पालकमंत्री म्हणाले की, संत्रा उत्पादकांना झालेल्या या नुकसानीविषयी विशेष पॅकेज देण्याच्या सूचना फलोत्पादन विभाग तसेच संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. अहवालाअंती निर्णय घेण्यात येईल.

25 thousand hectare farmers help! | शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत!

शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत!

अमरावती : पालकमंत्री म्हणाले की, संत्रा उत्पादकांना झालेल्या या नुकसानीविषयी विशेष पॅकेज देण्याच्या सूचना फलोत्पादन विभाग तसेच संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. अहवालाअंती निर्णय घेण्यात येईल. आजच्या या बैठकीत शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात यावी याविषयी ठराव घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अमरावती व नागपूर विभागात गत दोन वर्षापासून हवामानावर आधारीत पीक विमा योजना व राष्ट्रीय पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विम्याचा आर्थिक आधार असतो. परंतु प्रसिद्धीअभावी या योजनांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अमरावती व नागपूर येथील विभागीय कृषी सहसंचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच या दोन्ही विभागातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देखील नोटीस देण्यात आल्या आहेत. प्रतिसाद का लाभला नाही याविषयी अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल तसेच प्रसंगी निलंबनाची कारवाई केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
हवामानावर आधारित पीक विमा योजनेचा ट्रिगर हा पावसावर आधारित होता. या योजनेची मुदत ३० जून २०१४ संपली. मात्र फार थोड्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला.
परंतु सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ३ जुलै रोजी राष्ट्रीय पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे.
या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग असावा यासाठी ‘स्पेशल ड्राईव्ह’द्वारे शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे योजना पोहचविण्याची जबाबदारी कृषी अधिकारी व आत्मा यांच्यावर सोपविण्यात आली असून कृषी पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे पीक उगवलेच नसल्याच्या तक्रारी सोमवारच्या जिल्हा आढावा बैठकीत समोर आल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करण्यात येईल व त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येणार असून संबंधित बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, उस्मानाबाद जिल्ह्यात नित्कृष्ट बियाण्यांमुळे पीक उगवलेच नाही. अश्या तक्रारी आल्या असता त्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
खंडित पावसामुळे खरीप पिकांची स्थिती गंभीर आहे. पीक पेरणी उशिराने होत आहे. कालावधी पुरेसा राहत नसल्याने यंदा सरासरी उत्पन्नात घट होणार आहे, हे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे.
राज्याच्या खरीप हंगामाच्या स्थितीची आपण माहिती घेत आहोत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर नाही. प्रकल्पामध्ये वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे, जिल्ह्यात मागील वर्षी धारणी तालुक्यात १० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर्षी याच तालुक्यात ८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शासनाने तहसीलदारांना आता टँकर सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी ट्रॅक्टर भाडे, डिझेल आदी समस्या येत असल्याने खासगी टँकर मिळत नव्हते आता हा प्रश्न मिटला आहे. तालुकास्तरावर निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहे. तात्पूरत्या पाणी पुरवठा योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनांच्या तातडीने दुरूस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी स्तरावरून याविषयी सूचना देण्यात येऊन निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात पिकाची स्थिती गंभीर आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पेरणी उशीरा सुरू होत आहे. सद्यस्थितीत केवळ २२ टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षी यावेळेस ७० टक्के पेरणी झाली होती. पावसाचे प्रमाण कमी असल्याने उत्पादनदेखील कमी होणार आहे. राज्यात सरासरी २५ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पेरणीच्या सरासरीमध्ये तफावत आहे.
यावर्षी दुबार पेरणीचे फारसे संकट नाही. बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. सोयाबीन हे मागील वर्षीच्या हंगामात खराब झाल्याने उगवणशक्ती कमी आहे. बियाणे महामंडळाचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत. राज्यात १३५ लाख हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी होते. यापैकी १०५ हेक्टरमध्ये कपाशी सोयाबीनची पेरणी होते. पावसाअभावी शोचनीय स्थिती आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 25 thousand hectare farmers help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.