ग्रामीण क्षेत्रातील विकासकामांसाठी २५ लक्ष निधी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST2021-03-29T04:07:53+5:302021-03-29T04:07:53+5:30

अमरावती : राज्यात अल्पसंख्याकबहुल ग्रामीण भागात अनेक विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्यात येत ...

25 lakh funds distributed for development works in rural areas | ग्रामीण क्षेत्रातील विकासकामांसाठी २५ लक्ष निधी वितरित

ग्रामीण क्षेत्रातील विकासकामांसाठी २५ लक्ष निधी वितरित

अमरावती : राज्यात अल्पसंख्याकबहुल ग्रामीण भागात अनेक विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्यात येत आहे. त्याद्वारे जिल्ह्यातही विविध विकासकामांना चालना मिळणार असून, त्यासाठी २५ लक्ष निधी वितरित झाला आहे. सर्वसमावेशक विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी सांगितले.

ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार अल्पसंख्याक विभागाकडून राज्यातील विकासकामांसाठी ५७ कोटी ३३ लाख रुपये अर्थसंकल्पित करण्यात आले आहेत. त्यात मोर्शी व तिवसा तालुक्यातील विविध कामांचा समावेश आहे. ही कामे वेळेत पूर्ण व्हावी म्हणून निधी मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार चालू टप्प्यात २५ लक्ष रुपये निधी शासनाने अमरावती जिल्ह्यातील कामांसाठी वितरित केला आहे.

यापुढेही आवश्यक विकासकामांसाठी वेळीच निधी उपलब्ध होण्यासाठी नियमित पाठपुरावा करू. प्रशासन यंत्रणेने ही कामे गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करावीत. इतर आवश्यक कामांसाठी वेळेत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश ना. ठाकूर यांनी दिले आहेत.

बॉक्स

तिवसा व मोर्शी तालुक्यातील कामे मंजूर

मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील शेकूमियाँ दर्ग्याच्या विकासकामासाठी १० लक्ष रुपये, तिवसा तालुक्यातील कुऱ्हा मैदिव कब्रस्तानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी ८ लक्ष रुपये, तर आखतवाडा येथे कबीरमियाँ दर्ग्याच्या विकासकामांसाठी ७ लक्ष रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.

Web Title: 25 lakh funds distributed for development works in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.