दर्यापूर तालुक्यात वर्षभरात २४ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:37 IST2020-12-11T04:37:42+5:302020-12-11T04:37:42+5:30

१९ शासकीय मदतीसाठी पात्र, १४ कुटुंबांना मदत सचिन मानकर-दर्यापूर : सततची नापिकी व कर्जामुळे २०२० या वर्षात १४ नोव्हेंबरपर्यंत ...

24 farmers commit suicide in Daryapur taluka during the year | दर्यापूर तालुक्यात वर्षभरात २४ शेतकरी आत्महत्या

दर्यापूर तालुक्यात वर्षभरात २४ शेतकरी आत्महत्या

१९ शासकीय मदतीसाठी पात्र, १४ कुटुंबांना मदत

सचिन मानकर-दर्यापूर : सततची नापिकी व कर्जामुळे २०२० या वर्षात १४ नोव्हेंबरपर्यंत तालुक्‍यातील २४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. यापैकी १९ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत, तर पाच जणांची आत्महत्या विविध कारणांनी मदतीस अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.

सततची नापिकी, अस्मानी व सुलतानी संकट, बँका, सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या चिंतेतून दर्यापूर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली. काहींनी गळफास घेतला, तर काहींनी विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. दर्यापूर तालुका खारपाणपट्ट्यात असल्यामुळे येथील शेतकरी पिकांच्या उत्पादनासाठी पावसावरच अवलंबून असतात. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्य पीक असलेले मूग, सोयाबीन, उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दुसरीकडे घरी आलेल्या मालाला भाव नसल्याने व शासनाने कर्जमाफीचा आव आणून फसवणूक केल्याचा रोष तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

----------------

या गावांत झाल्या आत्महत्या

तालुक्यातील सांगवा बुद्रुक, येवदा, लेहेगाव, पिंपळोद, सासन, रामामपूर, जैनपूर, कुकसा, लासूर, भुईखेडा, गणेशपूर, गौरखेडा, शिंगणवाडी, उमरी ममदाबाद, थिलोरी, सुकळी, कांडली, लोतवाडा, वडनेरगंगाई, अंतरगाव, पिंपळोद या गावांमध्ये शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

--------------

शासनाने ठरविले अपात्र...

अंतरगाव येथील देवराव दादाराव घुगे , वडनेरगंगाई येथील नानीबाई दिवाकर गोंडवर, पिंपळोद येथील रामा हरिभाऊ गावंडे, वडनेरगंगाई येथील अजय जीवन वानखडे व आम्रपाली दादाराव लोणारे (रा. सांगवा खुर्द) यांची आत्महत्याप्रकरणे शासनाने अपात्र ठरविली आहेत. काही कर्ज नसल्यामुळे अपात्र ठरविण्यात आली, तर सांगवा खुर्द येथील मुलगी अल्पवयीन व आजारामुळे आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तिला मदतीस अपात्र ठरविण्यात आले.

--------------

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नावे बँकेचे थकीत कर्ज असल्यास त्यांच्या कुटुंबाला शासनाचा लाभ देण्यात आला. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीवर कर्ज नाही किंवा कुटुंबाच्या नावे शेतीवर कर्ज नाही, अशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात समितीने चौकशी केली. जे निकषात बसतील, त्यांना मदत दिली जाईल.

- योगेश देशमुख, तहसीलदार, दर्यापूर

Web Title: 24 farmers commit suicide in Daryapur taluka during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.