वर्षभरात २३ जणांना मिळाली दृष्टी
By Admin | Updated: June 10, 2015 00:17 IST2015-06-10T00:17:22+5:302015-06-10T00:17:22+5:30
नेत्रदान ही काळाची गरज असून अमरावती जिल्हा नेत्रदानात अग्रेसर आहे.

वर्षभरात २३ जणांना मिळाली दृष्टी
शस्त्रक्रियेत अग्रेसर : २५ हजार अंधत्व प्रमाणपत्र वितरण
इंदल चव्हाण/वसंत कुळकर्णी अमरावती
नेत्रदान ही काळाची गरज असून अमरावती जिल्हा नेत्रदानात अग्रेसर आहे. वर्षभरात १२८ नेत्र बुब्बुळे गोळा करण्यात आले असून त्यापैकी २३ जणांना नेत्रप्रत्योरापणातून नेत्रदृष्टी मिळाली आहे. नेत्रपेढीकडून आजपर्यंत २५ हजार रुग्णांना प्रमाणपत्र वितरित केले आहेत. आज जागतिक दृष्टीदिनानिमित्त सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करण्याची काळाची गरज आहे.
मानवी शरीरासाठी नेत्र हा अति महत्त्वाचा अवयव आहे. मात्र, नेत्र नसणाऱ्यांच नेत्राचे महत्त्व कळते. त्यामुळे दृष्टीहिनांना नेत्रदान करुन नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रपेढीला २०१४-१५ मध्ये ५ हजार २५० मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्टे मिळाले होते. त्यामध्ये त्यांनी ५ हजार ६०९ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे. तसेच नेत्र बुब्बुळे गोळा करण्यासाठी १०० रुग्णांचे उद्दिष्टे मिळाले असता त्यांनी १२८ मृतांचे डोळे काढून २३ जणांना दृष्टी दिली आहे. त्यामुळे २३ जणांना जग पाहण्याचे सौभाग्य लाभले आहे. या उपक्रमातून सर्वाधिक नेत्रदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यामुळे इर्विनच्या नेत्रपेढीचा महाराष्टातून प्रथम क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. १० जून हा जागतिक नेत्रदान दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य संघटनांनी केलेल्या सर्व्हेनुसार जगात २८५ दशलक्ष लोक दृष्टीहीन आहेत. त्यापैकी ३९ दशलक्ष लोक हे कायमचे अंध आहेत. २४६ दशलक्ष लोकांची दृष्टी कमी आहे. जागतिक पातळीवर अंधत्वाचे प्रमाण - ५८ टक्के अंधत्व ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक, ३५ टक्के लोक हे ४५ - ५९ या वयोगटातील आहेत. ७ टक्के १५-४४ या वयोगटातील आहेत. ४ टक्के अंधत्व हे ४ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहे. सद्याच्या अंदाजानूसार २०२० पर्यंत कायम अंध लोकांची संख्या ७५.३९ दशलक्ष तर २००.३९ दशलक्ष ही दृष्टी कमी असलेल्या लोकांची संख्या असेल, असा अंदाज मांडण्यात आला आहे.
नेत्रदान म्हणजे काय व ते केव्हा केले जाऊ शकते?
मृत्यूनंतर डोळ्यांचे दान केले जाऊ शकते. नेत्रदानामध्ये फक्त कोर्नेआ काढला जातो व त्या कोर्नेआच प्रत्यारोपण गरजू लोकांना केला जातो.
नेत्रदान कोण करू शकते?
कुठल्याही वयाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. नंबरचा चष्मा वापरणारे किंवा मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले व्यक्ती, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर आजार असलेले व्यक्तीदेखील नेत्रदान करू शकतात.
नेत्रादानासाठी अशी
घावयाची काळजी
मृत्यूनंतर सहा तासांपर्यंत नेत्रदान केले जाऊ शकतात. त्यामुळे मृत्यूनंतर ताबडतोब नेत्रपेढीशी संपर्क करणे गरजेचे आहे. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्यात. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेवू शकता.
अंधत्वाची कारणे :
अंधत्वाची मुख्य कारणामध्ये मोतिया बिंदू (४७.८%), काचबिंदू (१२.३%), वयानुसार दृष्टी कमी होणे (८.७%), कोर्नेआ अंधुक आदींचे प्रमाण कमी होतात. अंधत्वाला मोतीयाबिंदू हा प्रमुख कारण आहे. अंधत्वाचा. जगात १७.६ दशलक्ष लोकांना मोतियाबिंदूमुळे अंधत्व आलेला आहे.
अमरावतीमध्ये नेत्रपेढी कुठे आहेत?
अमरावतीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेत्रपेढी आहे. दिशा ग्रुप या धर्मदाय संस्थेद्वारा संचालित दिशा आय बँक अमरावतीमध्ये २ वर्षांपासून कार्यरत आहेत.
कोणाला नेत्र हवे असल्यास काय करावे?
दिशा आय बँक या ठिकाणी प्रतीक्षा यादी उपलब्ध आहे. अंध व्यक्तीची चाचणी करून त्याचे नाव प्रतीक्षा यादीत टाकले जाते. जसे जसे डोळे दान केले जातात तसे त्यांचे वाटप केले जाते. कोर्नेअल प्रत्यारोपणचा खर्च जवळपास ५००० रुपये येतो.
नेत्रदानात अमरावती शहर अव्वल असून इर्विनमधील नेत्रपेढीकडून नेत्रदानासंदर्भात सातत्याने जनजागृती कार्यक्रम राबविले जाते. नागरिकांनी नेत्रदानात पुढाकार घेऊन अंधाच्या जीवनात प्रकाश टाकणे गरजेचे आहे.
- अरुण राऊत,
जिल्हा शल्यचिकित्सक.
जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीमध्ये कार्यरत अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमाने व सहकार्याने नेत्रदान व मोतीबिंदू नेत्रशस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहेत. त्यामुळे अमरावती जिल्हा नेत्रदानात अग्रेसर आहे.
- राजेश जवादे,
नेत्र शल्यचिकित्सक.