सातेफळ येथे २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:15+5:302021-07-07T04:15:15+5:30
चांदूर रेल्वे : तालुक्यातील सातेफळ येथील एका २२ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. सासरच्या लोकांच्या मानसिक त्रासाला ...

सातेफळ येथे २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
चांदूर रेल्वे : तालुक्यातील सातेफळ येथील एका २२ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. सासरच्या लोकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार विवाहितेच्या भावाने दिल्यानंतर तळेगाव दशासर पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये ५ जुलै रोजी गुन्हे दाखल केले.
फिर्यादी मनोज संतोष सहारे (रा. पथ्रोट) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण रोशनी (२२) हिचे लग्न २८ जून २०२० ला चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ येथील राहुल रमेश शेंडे यांच्यासोबत धार्मिक रीतीरिवाजाने झाले होते. २ जुलै रात्री ९.३० वाजता त्यांच्या मोबाईलवर रोशनीने कॉल केला. सासू व जावई मानसिक त्रास देत असल्याचे तिने सांगितले. ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सातेफळला एका मित्रासोबत मनोज सहारे हे गेले असताना रोशनी ही तिच्या स्टेशनरी दुकानात बसलेली होती. ते आत गेल्यानंतर रोशनीने विष घेतल्याची आरडाओरड राहुलने केली. यानंतर त्यांनी चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला नेले. डॉक्टरांनी रोशनीला मृत घोषित केले.
रोशनीचा मृतदेह इर्विनमध्ये ठेवून मनोज सहारे यांनी तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठले. राहुल रमेश शेंडे, रमेश शेंडे व एक महिला यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी कलम ४९८ - अ, ३०६, ३४ अन्वये ५ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. तिघेही पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार आकरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे करीत आहेत.