पश्चिम विदर्भात पोलिस पाटलांची २००० पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:07 IST2025-02-17T12:07:19+5:302025-02-17T12:07:43+5:30
Amravati : प्रशासनासह पोलिसांची श्रृंखला पश्चिम विदर्भात विस्कळीत

2000 police posts vacant in West Vidarbha
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रशासनासह पोलिस यंत्रणेचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलिस पाटलांची तब्बल २०४८ पदे पश्चिम विदर्भात रिक्त आहेत. एकूण मंजूर ५७९८ पदांच्या तुलनेत ३६ टक्के पदे रिक्त असल्याने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे वास्तव आहे.
पूर्णवेळ प्रशासन व पोलिसांना सहकार्य करीत असल्याने गावपातळीवरचे हे महत्त्वाचे पद आहे, तरीही या पदाच्या नियुक्तीसाठी प्रशासनात दिरंगाई होत असल्याचा पोलिस पाटील संघटनेचा आरोप आहे. पोलिस पाटील हा ग्रामीण भागातील एक महत्त्वाचा प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाचा घटक व शासन आणि पोलिस प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. गावातील कायदा-सुव्यवस्था राखणे सोबतच शांतता आणि सुव्यवस्थेसाठी प्रयत्न करणे, अनुचित प्रकारांबाबत पोलिस ठाण्याला माहिती देणे यासह अन्य कर्तव्य पोलिस पाटील वेळोवेळी पार पाडतात.
स्थानिक वाद सोडविण्यात महत्त्वाची भूमिका
गावात एखादी संशयास्पद व्यक्ती आल्यास पोलिसांना तत्काळ कळवणे, चोरी, मारामारी, खून, दंगल यासारख्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे, पूर, आगीसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि बचावकार्य करणे, गावकऱ्यांना आपत्तीविषयी सतर्क करणे आणि मदत पुरवणे यासोबतच स्थानिक वाद सोडवणे यासह अनेक कार्य पोलिस पाटील करतात.
पश्चिम विदर्भातील स्थिती
मंजूर पदे - ५७९८
कार्यरत पदे - ३७५०
रिक्त पदे - २०४८
"पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्यात यावी, मानधनवाढ, यासह अन्य मागण्यांसाठी शासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संघटनेद्वारा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल."
- राहुल उके, कार्यकारी अध्यक्ष, पोलिस पाटील संघटना.