पोलीस हवालदाराशी चकमक; वाहनचालकाला दोन वर्ष सक्तमजुरी
By प्रदीप भाकरे | Updated: December 21, 2022 17:51 IST2022-12-21T17:48:38+5:302022-12-21T17:51:44+5:30
सन २०१४ मधील घटना : वाहनाची कागदपत्रे न दाखवता अरेरावी

पोलीस हवालदाराशी चकमक; वाहनचालकाला दोन वर्ष सक्तमजुरी
अमरावती : पोलीस हवालदाराशी लोंबाझोंबी करणाऱ्या वाहनचालकाला दोन वर्ष सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक ३ आर. व्ही. ताम्हणेकर यांनी २१ डिसेंबर रोजी हा निर्णय दिला. शेख समीर शेख बब्बू (३०, कसाबपुरा, वलगाव) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
विधीसुत्रानुसार, वाहतूक अंमलदार मधुकर गवई हे १९ डिसेंबर २०१४ रोजी गांधी चौकात कर्तव्यावर असताना एका ट्रिपलसिट चालकाला त्यांनी थांबविले. शेख समीर नामक त्या वाहनचालकाकडे गवई यांनी वाहनाची कागदपत्रे मागितली. त्यावर ती न देता शेख समीरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. गवई यांनी त्याला पकडले असता, त्याने लोंबाझोंबी करून त्यांना खाली पाडले. जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आरोपीविरूद्ध शासकीय कामकाजात अडथळा, मारहाणीचा गुन्हा दाखल केला. तत्कालिन तपास अधिकारी सुनिल जामनेकर यांनी आरोपपत्र दाखल केले. यात अतिरिक्त सरकारी वकील पंकज इंगळे यांनी सहा साक्षीदार तपासले. साक्ष व युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधिशांनी आरोपीला शिक्षा ठोठावली. अंमलदार बाबाराव मेश्राम यांनी पैरवी केली. तर अरूण हटवार व विजय आडे यांनी सहकार्य केले.