१९२७ साली आंबेडकरांनी उभारला अंबादेवी मंदिर प्रवेशाचा लढा
By Admin | Updated: April 14, 2016 00:12 IST2016-04-14T00:12:53+5:302016-04-14T00:12:53+5:30
येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात अस्पृश्य हिंदूंना प्रवेश मिळावा, यासाठी देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी पुढाकार घेतला होता....

१९२७ साली आंबेडकरांनी उभारला अंबादेवी मंदिर प्रवेशाचा लढा
डॉ. पंजाबराव देशमुख, गणेश गवर्इंचा पुढाकार : इंद्रभुवन नाट्यगृहात परिषदेचे आयोजन
अमरावती : येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात अस्पृश्य हिंदूंना प्रवेश मिळावा, यासाठी देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. त्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १३ नोव्हेंबर १९२७ रोजी परिषदेसाठी बोलावण्यात आले होते. जवाहर गेटच्या आतील इंद्रभुवन नाट्यगृहात आंबेडकरांच्या अध्यक्षपदी परिषददेखील आयोजित करण्यात आली. या घटनेला ८९ वर्षे ११ महिन्यांचा कालावधी झाला आहे.
आॅगस्ट १९२७ पासून अंबादेवी मंदिरात अस्पृश्य हिंदूंना प्रवेश मिळविण्याविषयी सत्याग्रह करण्याचा विचार अमरावतीच्या काही परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी चालविला होता.
त्यावेळी मंदिराच्या विश्वस्तांना तसे लेखी कळविण्यात आले होते. तीन महिन्यानंतर यात एक समेट घडून आला; परंतु तो फिस्कटला. त्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख व गणेश गवई त्यांच्यासारख्या पुढाऱ्यांनी ते प्रकरण मोठ्या धैर्याने धसास लावण्याचे ठरविले. आणि, त्यासाठी अमरावतीत त्यासाठी एक परिषद बोलावली. या परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. आंबेडकरांची निवड झालेली होती. या परिषदेसाठी देवराव नाईक, रा.ना. शिवतकर, रा. दा. कांबळी, दा.वि. प्रधान या सहकाऱ्यांसोबत डॉ. आंबेडकर अमरावती येथे आले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्याग्रह करुन लढा देण्यासाठी १३ व १४ नोव्हेंबर १९२७ रोजी दादासाहेब बोके यांच्या इंद्रभुवन नाट्यगृहात सत्याग्रह बैठक झाली. तेव्हा अंबामंदिर सर्वांच्या प्रवेशासाठी खुले करण्यासाठी लढा देण्यावर एकमत झाले. याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख, बॅरि. तिडके, गणेश गवई, सी. के. देशमुख, डॉ. दाजीसाहेब पटवर्धन, पंढरीनाथ पाटील, आनंदराव चौबीतकर, नानासाहेब अमृतकर, बाबूराव चौबळ आदी पुढारी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. पंजाबराव देशमुखांचे जोरदार भाषण झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांचे ओजस्वी व विद्वत्तापूर्ण भाषण झाले. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ममता आणि समतेने अंबामंदिर प्रवेशाचा प्रश्न हाताळावयाचा होता. त्यांना स्पृश्य व अस्पृश्य यांच्यात कोणत्याही प्रकारचा संघर्ष वा तणाव निर्माण होऊ द्यायचा नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘सत्याग्रह परिषदे’चे अध्यक्ष या नात्याने सत्यशोधक-कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करुन अत्यंत संयमपूर्वक व सनदशीर मार्गाने अंबादेवी मंदिर प्रवेशाचा प्रश्न हाताळला. श्रीमंत दादासाहेब खापर्डे अंबादेवी मंदिर विश्वस्त मंडळीचे प्रेमाने मनपरिवर्तन करण्यात आणि सत्यशोधकीय कार्यकर्त्यांच्या भावनेचा उद्रेक होण्यापूर्वी त्याला आवर घालण्यात यशस्वी झाले. १३ नोव्हेंबर १९२७ रोजी डॉ. आंबेडकरांचा अंबानगरीत मुक्काम होता.