१.८६ लाख हेक्टरला फटका, २०६ कोटींच्या निधीची मागणी
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 22, 2023 19:03 IST2023-12-22T19:02:38+5:302023-12-22T19:03:25+5:30
अवकाळीने २.९९ लाख शेतकरी बाधित; पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल

१.८६ लाख हेक्टरला फटका, २०६ कोटींच्या निधीची मागणी
अमरावती : जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान झालेल्या अवकाळीने २,९७,९७२ शेतकऱ्यांच्या १,८५,६९६ हेक्टरमधील खरीप व रब्बी पिके, फळपिके व भाजीपाला पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे. यासाठी २०६ कोटी ३३ लाख ३२ हजार ८३० रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शासनाकडे केली.
अवकाळीने २,५१,०४९ शेतकऱ्यांच्या १,४८,०४३ हेक्टरमधील जिरायती पिकांचे नुकसान झालेले आहे. यासाठी १२५.८३ कोटींच्या अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली. यामध्ये नांदगाव व तिवसा तालुक्यांत नुकसान निरंक आहे. प्रत्यक्षात तिवसा तालुक्यात ११,५०९ हेक्टर व नांदगाव तालुक्यात ४,२२८७ हेक्टर बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
कापूस फुटायला सुरुवात झालेली असताना मजुरांअभावी वेचणी रखडली होती. दरम्यान अवकाळीने दणका दिल्याने कापूस बोंडातच भिजला व प्रतवारी घटली. याशिवाय तुरीचा बहर गळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा १.६५ लाख हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता.