१५ विदेशी प्रवासी जिल्ह्यात, चार जण संपर्काबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:01 IST2021-12-05T05:00:00+5:302021-12-05T05:01:00+5:30
आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आलेल्या नागरिकांची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी होत आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेच्या‘इंट्रीग्रेटेड डिसीज सर्व्हायलन्स प्रोग्राम’ या संबंधित विभागाला जिल्ह्यात परतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशाचे नाव, पत्ता व फोन नंबर पाठविला जातो व त्यानंतर आरोग्य विभागाद्वारा त्या प्रवाशाची आठ दिवसांनी दुसरी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते व ती निगेटिव्ह आल्यास त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपुष्टात आणला जातो.

१५ विदेशी प्रवासी जिल्ह्यात, चार जण संपर्काबाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गत चार दिवसांत विदेशातून १५ प्रवासी जिल्ह्यात परतले आहेत. यापैकी ११ नागरिकांचा आरोग्य यंत्रणेशी संपर्क झालेला आहे. याव्यतिरिक्त चार जणांचा अद्याप संपर्क झालेला नाही. त्यांची घरे कुलूपबंद आढळून आल्याने आरोग्य विभागाद्वारा पोलीस आयुक्तांना तशी सूचना देण्यात आलेली आहे.
विदेशातून परतलेल्यांपैकी एक प्रवासी पूर्व आफ्रिका या हायरिस्क देशामधील आहे. त्यांची विमानतळावर झालेली आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. ते सध्या क्वारंटाईन आहेत व पहिल्या चाचणीनंतरच्या आठ दिवसानंतर त्यांची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. ती निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपुष्टात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आलेल्या नागरिकांची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी होत आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेच्या‘इंट्रीग्रेटेड डिसीज सर्व्हायलन्स प्रोग्राम’ या संबंधित विभागाला जिल्ह्यात परतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशाचे नाव, पत्ता व फोन नंबर पाठविला जातो व त्यानंतर आरोग्य विभागाद्वारा त्या प्रवाशाची आठ दिवसांनी दुसरी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते व ती निगेटिव्ह आल्यास त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपुष्टात आणला जातो. जिल्ह्यात अमेरिका, दुबई, पूर्व आफ्रिका आदी देशांमधील आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने निर्बंध कठोर केले आहेत.
शहरात सात, ग्रामीणमध्ये आठ प्रवासी
विदेशातून जिल्ह्यात परतलेल्या १५ प्रवाशांपैकी अमरावती शहरात सात प्रवासी, तर जिल्हा ग्रामीणमध्ये आठ प्रवासी आहेत. यामध्ये तिवसा तालुक्यात अमेरिकेतून पाच, अचलपूर येथे दोन व मोर्शी तालुक्यातील एकाचा समावेश आहे. या सर्वांचा आरोग्य विभागाशी संपर्क झालेला आहे. अचलपूर येथे एकाचा संपर्क झाला नव्हता. मात्र, हा प्रवासी ऑस्ट्रेलियाला परतला आहे.
भारतात अनेक ठिकाणी प्रवास
जिल्ह्यात परतलेले विदेशी नागरिक हे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर त्यांनी देशांतर्गत विविध ठिकाणी भेटी देल्या आहेत. अर्थात त्यांची आरटीपीसीआर चाचणी विमानतळावर निगेटिव्ह आलेली असल्याने धोका नाही. मात्र, पुन्हा आठ दिवसांत दुसरी चाचणी होणेही महत्त्वाचे आहे.
अमरावती शहरात सात आंतरराष्ट्रीय प्रवासी आलेत. यापैकी चार प्रवाशांचा संपर्क झालेला नाही. त्यांची माहिती पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे देण्यात आलेली आहे.
- डॉ विशाल काळे,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी