कुणाला खुर्ची अन् कुणाला मिळणार मिर्ची; बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी १४३ मुक्त चिन्हे
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 19, 2023 17:04 IST2023-04-19T17:04:06+5:302023-04-19T17:04:40+5:30
शुक्रवारी चिन्ह वाटप

कुणाला खुर्ची अन् कुणाला मिळणार मिर्ची; बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी १४३ मुक्त चिन्हे
अमरावती : निवडणूक कोणतीही असो उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांसाठी अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वच पक्षांची नजर असते, याला सहकारातील बाजार समितीची निवडणूकदेखील अपवाद नाही. यानिवडणुकीसाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाद्वारा १४३ मुक्तचिन्ह निश्चित केलेले आहे. यामधूनच तीन चिन्हांचा पर्याय उमेदवारांना दिलेला आहे. हे चिन्हेदेखील मजेदार आहेत. यामध्ये कुणाला खुर्ची तर कुण्या उमेदवाराला मिर्चीदेखील मिळणार आहे.
जिल्ह्यात १२ बाजार समितींच्या निवडणुकीत २१६ संचालकपदांसाठी ११३९ उमेदवार रिंगणात आहेत. २० एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्जाची माघार घेता येणार आहे. यानंतर २१ तारखेला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारतेवेळी अचुकपणे दिनांक व वेळ नोंद केलेली आहे व त्याच क्रमानूसार चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारांनी एकाच चिन्हाची मागणी केली असेल तर प्रथम आलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य या तत्वाने निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे व यासाठी अर्जावर नमूद तारीख व वेळ याचा आधार घेतल्या जाणार आहे. यानिवडणुकीत पॅनल व काही उमेदवारांद्वारा विशिष्ट चिन्हांची मागणी असल्याने चिन्ह वाटप करतांना अधिकाऱ्यांची चांगलीच कसरत होणार आहे.