१४,१९३ ग्राहकांकडे १२ कोटी ५९ लाखांवर वीज बिल थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:53 IST2025-04-10T14:52:54+5:302025-04-10T14:53:25+5:30

Amravati : दर्यापूर तालुक्यातील थकबाकीदारांवर महावितरणचे लक्ष केंद्रित; बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित, काहींनी वर्षभरापासून दिली नाही रक्कम

14,193 customers have outstanding electricity bills of 12.59 crores. | १४,१९३ ग्राहकांकडे १२ कोटी ५९ लाखांवर वीज बिल थकीत

14,193 customers have outstanding electricity bills of 12.59 crores.

अनंत बोबडे
लोकमत न्यूज नेटवर्क
येवदा :
दर्यापूर शहरासह तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग व अंजनगाव सुर्जी, भातकुली तालुक्यांतील गावे समाविष्ट असलेल्या महावितरणच्या दर्यापूर उपविभागातील एकूण ४९,०४० वीज ग्राहकांपैकी १४ हजार १९३ जणांकडे तब्बल १२ कोटी ५९ लाख १९ हजार ७७१ रुपये वीज बिल थकीत आहे. या थकबाकीदारांनी मुदतीत वीज बिलाचा भरणा न केल्यास त्यांचा पुरवठा खंडित केला जाणार असल्याची ताकीद उपकार्यकारी अभियंता विक्रम काटोले, सहायक लेखापाल सचिन धवने यांनी दिली.


कधीकाळी शहरातील वीजग्राहकांची ९० टक्के वसुली होती. मात्र, गत काही वर्षापासून बाभळी, बनोसा, दर्यापूर शहर व उपविभागांतर्गत ग्रामीण भागातील विविध प्रकारांतील ग्राहक वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने १२ कोटींपेक्षा जास्त थकबाकी झाली आहे. काहींनी दोन ते सहा महिने, तर काहींनी वर्षभरापासून वीज बिल भरलेले नाही. महावितरणने त्यांना मार्च अखेरपर्यंत अल्टिमेटम देऊन कारवाईचा इशारा दिला आहे. 


वीज प्रकार              थकबाकी 
घरगुती                  २,६४,९९,२१०
व्यावसायिक           ३५,३४,९४०
औद्योगिक              १,१९,०५,४१३
पथदिवे                  ७,६१,०१,४४६
पाणीपुरवठा            २४,६१,४६२
सार्वजनिक सेवा       ३३,८८,२९८
इतर                       १६,६९,९७१
एकूण थकबाकी      १२,५९,१९,७७१


वसुलीसाठी वेगवेगळी पथके गठित
दर्यापूर तालुक्यातील वीज ग्राहकांकडील वसुलीसाठी वेगवेगळी पथके तयार केली असून, थकीत रक्कम वसूल करण्यात येत असल्याची माहिती महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाने दिली.


"शाळा-महाविद्यालयीन परीक्षेचे दिवस असल्याने वीजपुरवठा खंडित केल्यास पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. भारनियमनाचे संकट येऊन उन्हाळ्यात नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे थकबाकीदारांनी वीज बिल भरावे."
- सुधाकर भारसाकळे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस.


"घरगुती ग्राहक व सार्वजनिक पथदिव्यांची सर्वाधिक थकबाकी आहे; मार्च एंडिंगमुळे वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई युद्धस्तरावर सुरू आहे. चार महिन्यांत ९९५ मीटरवरील वीजपुरवठा खंडित केला आहे."
- विक्रम काटोले, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, दर्यापूर.

Web Title: 14,193 customers have outstanding electricity bills of 12.59 crores.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.