१४ हजार ८० जण मेळघाटाबाहेर; पाण्याअभावी स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:59 IST2019-06-21T12:58:53+5:302019-06-21T12:59:23+5:30
मेळघाटातील ४ हजार ४५२ कुटुंबांतील १४ हजार ८० लोक मेळघाटबाहेर गेले आहेत. त्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ८ हजार ५०८ बालकांचा समावेश आहे.

१४ हजार ८० जण मेळघाटाबाहेर; पाण्याअभावी स्थलांतर
लोकमत न्यूज नेटवर्क
अनिल कडू
अमरावती : मेळघाटातील ४ हजार ४५२ कुटुंबांतील १४ हजार ८० लोक मेळघाटबाहेर गेले आहेत. त्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ८ हजार ५०८ बालकांचा समावेश आहे. बेरोजगारी पाठोपाठ पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांनी हा पवित्रा घेतला आहे. मेळघाटातील २७ नळयोजनांसह २४७ हँडपंप बंद पडले आहेत. यात धारणी तालुक्यातील १८९ हँडपंप व सात नळयोजना आणि चिखलदरा तालुक्यातील ५८ हँडपंपांसह २० नळयोजना बंद आहेत.
मेळघाटातील धारणी तालुक्यातील २७, तर चिखलदरा तालुक्यातील १४ अशा एकूण ४१ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, १३ बोअरवेलसह ५९ विहिरी कोरड्या पडल्या आहेत. मेळघाटातील ६६ ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगाने जोखीमसदृश पिवळे कार्ड देण्यात आले आहेत.
मेळघाटबाहेर पडणाऱ्या लोकांमध्ये चिखलदरा तालुक्यातील सर्वाधिक १० हजार ३९४ नागरिक आहेत. यात एकट्या सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५ हजार ७४९, तर टेम्ब्रुसोंडा अंतर्गत २ हजार ८६० नागरिकांचा समावेश आहे. धारणी तालुक्यातील ३ हजार ६८६ लोक मेळघाटबाहेर आहेत. यात कळमखारमधून सर्वाधिक १ हजार ७, तर साद्राबाडीमधून ८७५ स्त्री-पुरुष मेळघाटबाहेर पडले आहेत.
दरवर्षी रोजगाराकरिता आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात मेळघाटबाहेर स्थलांतरित होतात. मेळघाटात रोजगार असला तरी गावपातळीवर त्यांची माहिती सर्वांनाच उपलब्ध होत नाही. ही कामे मेळघाटबाहेरील मजूर, ठेकेदार, यंत्राच्या साहाय्याने करून घेतली जातात. यात मेळघाटातील मजूर रोजगारापासून वंचित राहतात, शिवाय ते कामावर येत नसल्याची ओरड केली जाते.
दरम्यान, मेळघाटातील सिपना वन्यजीव विभागांतर्गत सेमाडोह, रायपूर, हतरू, चौराकुंडसह अन्य क्षेत्रांत नदीत वडार बंधारे बांधले गेले. हे काम भिमा कोरेगाव, पुणे, सातारा येथील ठेकदार व मजुरांकडून घेण्यात आले. एक ते दीड महिना हे मजूर मेळघाटात मुक्कामी होते. शासकीय वाहनांसह सेमाडोह संकुल आणि वनविश्रामगृह त्यांच्या दिमतीला होते. मेळघाट (प्रादेशिक) वनविभागातील जारिदा वनपरिक्षेत्रात जाळीचे बंधारे बुलडाणा जिल्ह्यातील ठेकेदार व मजुरांकडून बांधून घेतले गेले.
स्रोत आटले
मेळघाटात पिण्याचे पाणी नाही. जे पाणी आहे, ते मेळघाट वासियांना अपुरे पडत आहे. पाण्याची त्यांना दिवसभर प्रतीक्षा करावी लागत आहे. बहुतांश पाण्याचे स्रोत आटले आहेत. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नळ योजना व हँडपंप बंद पडले आहेत. उपलब्ध होणारे किंवा येणारे पाणी मिळविण्याकरिता त्यांना संघर्ष करावा लागत आहे.
कोरड्या विहिरीत उतरून पाण्याचा झारा, पाणी शोधण्याचा प्रयत्न आदिवासी करीत आहेत. तासन्तास विहिरीच्या कठड्यावर बसून तळाशी बादली बुडण्याएवढे पाणी कधी गोळा होते, यातच ते गुंतून राहत आहेत. ज्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होते, तेथे थेट पुरवठा न करता टँकर विहिरीत रिता केला जातो. मोथा येथील मनीषा धांडे मृत्यूप्रकरण अशाच प्रकारातून घडले आहे.