अचलपुरात १४ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST2020-12-04T04:34:41+5:302020-12-04T04:34:41+5:30

जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचा अहवाल : डेंग्यूसदृश ११३ रुग्णांचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेकडे परतवाडा : जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडून प्राप्त अहवालावरून ...

14 patients tested positive for dengue in Achalpur | अचलपुरात १४ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह

अचलपुरात १४ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह

जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचा अहवाल : डेंग्यूसदृश ११३ रुग्णांचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेकडे

परतवाडा : जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडून प्राप्त अहवालावरून अचलपुरात १४ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले, चिकनगुनियाचे चार रुग्ण निघाले आहेत. शासकीय यंत्रणेकडून शिक्कामोर्तब झालेल्या १४ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सात रुग्ण अचलपूर शहरातील, तर उर्वरित सात अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आहेत.

जिल्हा हिवताप यंत्रणेकडून १ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय उपजिल्हा रुग्णालयातील यंत्रणेकडे हे डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ग्रामीण भागातील सात डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तीन रुग्ण एकलासपूरमधील, तर कांडली, सावळी, भिलोना आणि वडगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. यापूर्वी प्राप्त अहवालात चार रुग्ण चिकनगुनिया पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात अचलपूर शहरातील दोन, एक कांडलीतील आणि एक अंजनगाव टाकरखेडा येथील रुग्णाचा समावेश आहे.

डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या सप्टेंबर महिन्यापासून अचलपूरमध्ये वाढायला लागली. सप्टेंबरपूर्वी या रुग्णांचे प्रमाण कमी होते. डेंग्यूचा वाढता प्रकोप बघता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील खासगी दवाखान्यांत डेंग्यूसदृश रुग्णांची उपचारार्थ गर्दी वाढली. याची दखल घेत अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील हिवताप यंत्रणेकडून सप्टेंबरपासून नोव्हेंबर अखेरपर्यंत डेंग्यूसदृश संशयित अशा १०४ रुग्णांचे व १ डिसेंबर रोजी नऊ अशा एकूण ११३ रुग्णांचे रक्तजल नमुने एनआयव्हीकरिता जिल्हा यंत्रणेकडे पाठविण्यात आले आहेत. यातील चौदा रुग्णांचे रक्तजल नमुने डेंग्यू पॉझिटिव्ह, चार रुग्णांचे रक्तजल नमुने चिकनगुनिया पॉझिटिव्ह निघाले आहेत.

एनआयव्ही टेस्टकरिता पाठविण्यात आलेल्या ११३ रक्तजल नमुन्यांत अचलपुर नगर पालिका क्षेत्रातील ४०, अचलपुर ग्रामीणमधील ३७, अंजनगावमधील २१, चांदूर बाजारमधील ११, अन्य तालुक्यांतील तीन आणि राज्याबाहेरील एक रक्तजल नमुन्याचा समावेश आहे. खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल २४ रुग्णांचे रक्तजल नमुने त्यात समाविष्ट आहेत. एनआयव्ही टेस्ट डेंग्यू पॉझिटिव निघाल्यानंतर हिवताप यंत्रणेकडून अचलपूर नगर पालिकेसह ग्रामीण यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शहरासह ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि वातावरणीय बदलांमुळे डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजही शहरातील, गावातील गटारांची, नाल्यांची योग्य पद्धतीने स्वच्छता नाही. नगरपालिकेसह ग्रामपंचायत स्तरावर संबंधित यंत्रणेकडून परिणामकारक फवारणी व धुरळणी करण्यात आलेली नाही. डासांचे वाढते प्रमाण कमी करण्याकरिता उपाययोजना नाही. अस्वच्छता आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरी व ग्रामीण नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Web Title: 14 patients tested positive for dengue in Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.