८३९ ग्रामपंचायतींमध्ये वर्षभरात १३६९ दूषित पाणी नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:02 IST2019-02-20T22:02:17+5:302019-02-20T22:02:36+5:30
जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींतर्गत १६८७ गावांतील आरोग्य यंत्रणनेने या वर्षात तपासलेल्या १८५६५ पाणीनमुन्यांपैकी १३६७ पाणीनमुने दूषित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

८३९ ग्रामपंचायतींमध्ये वर्षभरात १३६९ दूषित पाणी नमुने
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींतर्गत १६८७ गावांतील आरोग्य यंत्रणनेने या वर्षात तपासलेल्या १८५६५ पाणीनमुन्यांपैकी १३६७ पाणीनमुने दूषित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दूषित पाणी पिल्याने जलजन्य आजार होत असून १ एप्रिल २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान, सदर पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले होते. त्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांना सादर करण्यात आला.
दूषित पाणी नमुने आढळल्याची सरासरी टक्केवारी ७.३७ एवढी आहे. तर २५१९ ब्लिचिंग पावडर नमुनेसुद्धा घेण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण यंत्रणेफार्मत १६८७ गावांतील जानेवारी महिन्यांत ८३९ पाणी नमुने घेण्यात आले. यामध्ये ११५ पाणीनमुने दूषित आढळले. या पाणी नमुन्यांमध्ये सार्वधिक दूषित नमुने १६५ अमरावती तालुक्यातील आहेत. १५० चिखलदार तालुक्यात, १३४ अचलपुरमध्ये, तर सर्वात कमी २१ चांदूररेल्वे तालुक्यात आढळले आहेत. साधारणत: पावसाळ्यात सार्वधिक दूषित पाणी नमुने आढळतात. पिण्याच्या पाण्यात कॉलीफॉर्म नावाचा बॅक्टेरीया आढळला तर याला दूषित पाणी मानला जातो. हा बॅक्टेरीयाच विविध जलजन्य आजाराला कारणीभूत ठरत असून दूषित पाणी वारंवार पिल्याने टायफाईड, कावीळ, गॅस्ट्रो (अतिसार), कॉलरा आजार होतात. म्हणून जिल्हा आरोग्य ग्रामीण यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या पाणीपुरवठा योजनेतून किंवा बोरवेल वरून नागरिकांना पिण्याकरिता पाणीपुरवठा करण्यात येतो ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? याची तपासणी केल्यानंतर पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत खासगीत आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
जलजन्य आजाराची २१६ जणांना लागण
दूषित पाण्यामुळे कावीळ, टायफाईड, कॉलरा असे आजार कारणीभूत ठरत असून, तालुकानिहाय प्राप्त झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार वर्षभरात चांदूर रेल्वे तालुक्यात कॉलरा गॅस्ट्रोचे ४४ जणांना लागण झाली होती. तिवसा तालुक्यात गॅस्ट्रोचे १०, वरूडमध्ये ४२, मोर्शीत २३, चिखलदार येथे ९६ असे एकूण २१६ जणांना जलजन्य आजाराची लागण झाली होती. तापाने धामणगाव तालुक्यातील एका रुग्णाचा, अतिसाराने तिवसा येथील एकाचा, तर गॅस्ट्रोने मोर्शी तालुक्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्याकारणाने मृत्यूलाही कारणीभूत ठरणारे व दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजाराकडे दुर्लक्षित करून चालणार नाही, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या ठिकाणी दर तीन महिन्यांत पाणी नमुने तपासणी करण्यात येते. पहिल्यांदा पाणीनमुने दूषित आढळल्यास तेथे सुपरक्लोरिनेशन करण्यात येते.
- सुरेश असोले. जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती.