१३ टक्के नागरिकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:28+5:302021-09-19T04:14:28+5:30
अमरावती : जिल्ह्यात सात महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असताना फक्त १३ टक्के नागरिकांनीच दोन्ही डोस घेतले आहे. ...

१३ टक्के नागरिकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस
अमरावती : जिल्ह्यात सात महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असताना फक्त १३ टक्के नागरिकांनीच दोन्ही डोस घेतले आहे. लसींना नियमित पुरवठा होत नसल्याने ही स्थिती ओढावली आहे. याशिवाय कोरोना संसर्ग माघारल्यामुळे लसीकरणात नागरिकांचा उत्साहदेखील कमी झालेला आहे. त्यामुळे तिसरी लाट आल्यास कसा रोखणार कोरोना, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सामूहिक रोगप्रतिकारशक्ती तयार होणे महत्त्वाचे आहे. यासाठी अधिकाधिक लसीकरण हाच प्रमुख उपाय आहे. याकरिता जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोव्हॅक्सिन व कोविशिल्डच्या लसीकरणास सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यात किमान १०० केंद्रांद्वारे लसीकरण होत आाहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत नियमित पुरवठा झाला नसल्याने लसीकरणाची प्रक्रिया माघारली होती. त्यातुलनेत सद्यस्थितीत समाधानकारक पुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा आरोग्य विभागाचे माहितीनुसार आतापर्यंत १३,२७,३८३ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. हे ४४ टक्के प्रमाण आहे. यामध्ये ९,४१,४३९ नागरिकांनी पहिला व ३,८५,९४४ नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाख गृहीत धरल्यास दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण हे १२.८६ टक्के असल्याचे स्पष्ट होत आहे.
बॉक्स
संसर्ग माघारल्यानंतर मोहीम थंडावली
महिन्यापासून पाच टप्य्यात लसीकरण होत असताना हे प्रमाण त्यातुलनेत कमी आहे. दुसऱ्या लाटेत पहाटे चारपासून नागरिक केंद्रांवर रांगा लावायचे, अनेक केंद्रांवर पोलीस संरक्षणात लसीकरण झालेले आहे. मात्र, त्यानंतर संसर्ग माघारल्यानंतर नागरिकांचा लसीकरणात उत्साह कमी असल्याचे दिसून येत आहे. याचाही परिणाम मोहिमेवर होत असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
जिल्ह्यात १४ लाख लसींचा पुरवठा
जिल्ह्यात आतापर्यंत १४,०७,४४० लसींचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामध्ये कोव्हॅक्सिन ११,१६,३३० व कोविशिल्डचे २,९१,११० डोस आहेत. यामध्ये १०,४४,४०६ नागरिकांनी कोव्हॅक्सिन तर २,८२,९७७ नागरिकांनी कोविशिल्डचा डोस घेतला आहे. आता ५० टक्के ऑनलाईन व ५० टक्के ऑफलाईन नोंदणी होत असतानाही लसीकरणाची मोहीम थंडावली आहे.
पाईंटर
झालेले लसीकरण : १३,२७३८३
आरोग्य कर्मचारी : ३९,३८८
फ्रंटलाईन वर्कर : ६७,७१८
१८ ते ४४ वयोगट : ४,४३,१४३
४५ ते ५९ वयोगट : ४,१९,९७९
६० वर्षावरील :३,५७,१५५