कोजागिरीसाठी १२ हजार लिटर दूध

By Admin | Updated: October 27, 2015 00:08 IST2015-10-27T00:08:34+5:302015-10-27T00:08:34+5:30

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अमरावतीकरांनी सोमवारी १२ हजार लिटर दूधाची मागणी केली होती.

12 thousand liters of milk for kojagiri | कोजागिरीसाठी १२ हजार लिटर दूध

कोजागिरीसाठी १२ हजार लिटर दूध

संदीप मानकर अमरावती
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अमरावतीकरांनी सोमवारी १२ हजार लिटर दूधाची मागणी केली होती. या मागणीत सातत्याने वाढ झाली. त्यामुळे अतिरिक्त पाच हजार लिटर दुधाची तरतूद करून ठेवल्याचे दुग्ध विकास योजनेच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कोजागिरी पौर्णिमेला हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. चंदामामाला साक्षी ठेवून जिल्हाभर कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. सन २०१४ मध्ये ६ ते ७ हजार लिटर दुधाचा मागणीनुसार पुरवठा करण्यात आला होता. यावर्षी यामध्ये ५ हजार लिटर दुधाची वाढ झाली आहे.
शेतकरीवर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाल्याचे दुग्ध शाळा व्यवस्थापक एस. बी. जांभुळे यांनी सांगितले. मागच्या वर्षी २१ लाख लिटर दुधाचे वार्षिक संकलन होते. यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन दूध संकलन २५ ते २६ लाख लिटरवर आल्याचे कळते. शहरात दररोज रोज ४ हजार लिटर दुधाची मागणी असते. कोजागिरीमुळे ही मागणी १२ ते १५ हजार लिटरवर गेली आहे.

दूध संकलनात वाढ दुधात भेसळीची शक्यता
दुधातील फॅट व सॉलिड नॉट फॅटचे प्रमाण प्रमाणित नसेल तर ती भेसळ मानली जाते. दुधात पाणी किंवा इतर केमिकलयुक्त पदार्थ टाकून भेसळ केली जाते. कोजागिरीनिमित्त दुधाची मोठी उलाढाल झाली. त्यामुळे भेसळयुक्त दुधाची विक्री करताना आढळल्यास अन्न औषधी प्रशासन विभाग कारवाई करणार आहे. यासाठी एक पथक नेमण्यात आले आहे.


५ लाख लिटरने वाढले वार्षिक संकलन
शेतकऱ्यांचा ओढा दुग्ध व्यवसायाकडे वाढल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत दूध संकलनात ५ लाख लिटरने वाढ झाली असून वार्षिक उलाढाल २५ ते २६ लाख लिटरच्या घरात गेली आहे. दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आल्याचे हे संकेत म्हणता येईल. शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाला पसंती दिली आहे.

अमरावतीत २५ दूध डेअऱ्या
अन्न व औषधी प्रशासन विभागांतर्गत २५अधिकृत परवानाधारक दूध डेअरी आहेत. येथे हजारो लिटर दुधाची विक्री होते. दुधाच्या उलाढालीमुळे सोमवारी दुधाचे भाव वधारले होते. कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. घरोघरी कोजागिरीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन होते. चांदण्यांमध्ये दूध आटवले जाते. त्यात मध्यरात्री पूर्णचंद्राचे प्रतिबिंब पडले की ही कोजागिरी प्राशन केली जाते. आरोग्यसंवर्धनासाठी देखील कोजागिरीचे दूध महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सोमवारी सर्वच दूध डेअऱ्यांमध्ये गर्दी होती.

शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय निवडल्यामुळे वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे. सोमवारी १२ हजार लिटर दुधाची तरतूद करण्यात आली आहे.
- एस.बी. जांभुळे,
दुग्धशाळा व्यवस्थापक, अमरावती.

Web Title: 12 thousand liters of milk for kojagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.