बाजार समिती निवडणूक ११३ उमेदवारांची माघार
By Admin | Updated: August 28, 2015 00:41 IST2015-08-28T00:41:56+5:302015-08-28T00:41:56+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी...

बाजार समिती निवडणूक ११३ उमेदवारांची माघार
अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गुरूवारी शेवटच्या दिवशी एकूण १८६ उमेदवारांपैकी तब्बल ११३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात केवळ ७३ उमेदवार कायम राहिले आहेत.
जिल्ह्यात सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळखली जाणाऱ्या अमरावती बाजार समितीसाठी येत्या १५ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. २७ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७३ उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत. यामध्ये या बाजार समितीवर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११ जागांसाठी सर्वसाधारण मतदारसंघात २३ उमेदवार, महिला मतदारसंघातून दोन जागांसाठी २ उमेदवार, इतर मागासवर्गातील एका जागेसाठी ३ उमेदवार, विमुक्त जाती/भटक्या जमातीसाठीच्या मतदारसंघातील एका जागेसाठी ३ उमेदवार, ग्रामपंचायत मतदारसंघातील एकूण चार जागांसाठी सर्वसाधारण गटातून निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठी १० उमेदवार, अनुसूचित जाती, जमातीसाठीच्या एका जागेकरिता ७ उमेदवारी अर्ज कायम आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघाच्या एका जागेकरिता २ उमेदवार, व्यापारी व अडते मतदारसंघातून दोन जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. व हमाल व तोलारी मतदारसंघाचे एका जागेकरिता ५ उमेदवारांनी नामांकन अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे एकूण ७३ उमेदवारांमधून बाजार समितीचे १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. कायम असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी व उमेदवारांना चिन्ह वाटप शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्या कार्यालयात दुपारी चार वाजता पासून होणार आहे. (प्रतिनिधी)