शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी ११० कोटींची योजना
By Admin | Updated: August 17, 2015 00:04 IST2015-08-17T00:04:09+5:302015-08-17T00:04:09+5:30
महानगरात पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित असलेली ४९ कोटींची योजना आता शाश्वत पाणीपुरवठा अंतर्गत ११० कोटींची होणार आहे.

शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी ११० कोटींची योजना
सर्वेक्षण : समस्या निकाली काढणार
लोकमत विशेष
गणेश वासनिक अमरावती
महानगरात पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित असलेली ४९ कोटींची योजना आता शाश्वत पाणीपुरवठा अंतर्गत ११० कोटींची होणार आहे. त्याकरिता नवीन भागाचे सर्वेक्षणअंती पुढील २५ वर्षांचे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात पिछाडीवर असलेल्या शहरांची अमृत योजनेत निवड करण्यात आली आहे. यात अमरावती शहराचा समावेश असून नागरिकांना शाश्वत पाणीपुरवठा केला जाणार आहे. केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था असे संयुक्तपणे अमृत योजनेत निधी मिळणार आहे. केंद्राचा ५० टक्के तर राज्य शासन आणि महापालिकांना २५ टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.
लवकरच सर्वेक्षण होणार
अमरावती : स्मार्ट सिटीनंतर केंद्र सरकारची दुसरी शाश्वत पाणीपुरवठ्याची योजना आहे. या योजनेत पाणीपुरवठ्याची गळती रोखणे, वितरण व्यवस्था सुधारणे, पाणीपट्टीची वसुली यंत्रणा सुधारणे याचा समावेश आहे. एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा या योजनेत समावेश केला आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातील शहरांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आवश्यक सोईसुविधांच्या दृष्टीने नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले जाईल. स्मार्ट सिटी अभियानात शहराला आवश्यक असलेल्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. सर्वांच्या घरी नळ जोडणी हे अभियान राबविले जाईल. स्टँडपोस्टमुक्त शहराची संकल्पना पूर्णत्वास आणताना २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणीपुरवठ्याच्या अद्ययावत सोईसुविधा पुरविण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. महापालिका हद्दीत असलेल्या लोकवस्तींचा आराखडा घेत जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. नव्याने जलकुंभाची निर्मिती करताना नवीन पंप स्टेशन, पाणी शुद्धिकरण केंद्राची निर्मिती, १५६ दशलक्ष लिटरची व्यवस्था सुधारण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. सुमारे ११० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना शासनाकडे पाठविली जाणार आहे. (प्रतिनिधी)