आयकरदात्या ८६२८ शेतकऱ्यांकडून १०.४१ कोटी वसुलपात्र
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 16, 2023 16:39 IST2023-04-16T16:39:11+5:302023-04-16T16:39:41+5:30
पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे जानेवारी २०१९ पासून दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या होत आहे.

आयकरदात्या ८६२८ शेतकऱ्यांकडून १०.४१ कोटी वसुलपात्र
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या निकषात अपात्र असतांनाही जिल्ह्यात ८६२८ शेतकऱ्यांनी १०.४१ कोटींचा लाभ घेतला आहे. यासंदर्भात वारंवार सूचना दिल्यानंतरही रक्कम परत केली नसल्याने, ही रक्कम आता वसुलपात्र आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावर आता बोजा चढविला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे जानेवारी २०१९ पासून दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या होत आहे. या योजनेमध्ये नोकरदार व आयकरदाते शेतकरी अपात्र असतांनाही ११,१७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यापैकी १०,४८० शेतकऱ्यांनी किमान एक हप्ताचा लाभ घेतला आहे. या योजनेत अपात्र शेतकऱ्यांनी १२.०७ कोटींचा लाभ घेतला आहे. योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीमध्ये ही बाब स्पष्ट झालेली आहे.
या आयकरदात्या लाभार्थ्यांपैकी १८५२ खातेदारांनी १.६६ कोटींची रक्कम शासनजमा केलेली आहे. तरिही ८६२८ लाभार्थ्यांकडे १०.४१ कोटींची रक्कम वसुलपात्र आहे. या खातेदारांना प्रशासकीय यंत्रणांद्वारा वारंवार सूचना पत्र देण्यात आल्यानंतरही या खातेदारांनी अद्याप रक्कम शासनजमा केलेली नाही. त्यामुळे शासनाद्वारा रक्कम वसुलीची कारवाई केली जाणार आहे.