बनावट स्वाक्षरीने १० लाखांचे ‘बिल’!
By Admin | Updated: January 22, 2017 00:03 IST2017-01-22T00:03:36+5:302017-01-22T00:03:36+5:30
प्रभागातील साफसफाईची देयके स्वास्थ अधीक्षकाच्या बनावट स्वाक्षरीने मंजूर होत असल्याची खळबळजनक बाब महापालिकेत उघड झाली आहे.

बनावट स्वाक्षरीने १० लाखांचे ‘बिल’!
महापालिकेतील तिघांना ‘शो-कॉज : साफसफाई कंत्राटदारांना राजाश्रय
अमरावती : प्रभागातील साफसफाईची देयके स्वास्थ अधीक्षकाच्या बनावट स्वाक्षरीने मंजूर होत असल्याची खळबळजनक बाब महापालिकेत उघड झाली आहे. या प्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसह सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी व स्वास्थ अधीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सुमारे १० लाख रुपयांची ही आर्थिक अनियमितता आहे.
एकीकडे हा संपुर्ण गोरखधंदा दडपविण्याचा प्रयत्न होत असताना कडक शिस्तीचे म्हणून ख्याती मिळविणारे अतिरिक्त आयुक्त याप्रकरणी कुठली कारवाई करतात? याची प्रतीक्षा कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना लागली आहे.
महापालिकेतील ४३ प्रभागांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी प्रभागनिहाय कंत्राटदार नेमण्यात आलेत दैनंदिन स्वच्छतेपोटी त्या कंत्राटदाराला महिन्याकाठी रक्कम दिली जाते. महापालिकेकडून कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याला दिवसाकाठी २६४ रुपये मोबदला देण्यात येतो. सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी आणि संबंधित बाबींची खातरजमा केल्यानंतर प्रभागाच्या स्वास्थ निरिक्षकांकडून अहवाल सादर केला जातो. अहवालाच्या अनुषंगाने तपासणी करुन पुढील कारवाईकरीता ही नोटशिट सहायक आयुक्तांकडून मुख्य कार्यालयाकडे फॉरवर्ड केली जाते. त्यानंतर स्वच्छता विभागाचा लिपिक देयक बनवितो. या देयकावर स्वास्थ निरिक्षक आणि स्वास्थ अधीक्षकांच्या स्वाक्षरी झाल्यानंतर त्यावर वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता आरोग्य अधिकारी स्वाक्षरी करतात. त्यानंतर ते देयक उपायुक्तांमार्फत अतिरिक्त आयुक्तांकडे जाते. अतिरिक्त आयुक्तांचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्या फाईलचा प्रवास कॅफोंच्या दिशेने होतो. त्यानंतर देयकाचे धनादेश काढले जातात.
या पार्श्वभूमिवर प्रभाग क्रमांक ४१ बारीपुरा येथिल बहिरमबाबा संस्था आणि प्रभाग क्रमांक ४२ सोमवार बाजार येथिल मरिमाता बचत गट बडनेरा या संस्थेची माहे जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांचे चार देयके अतिरिक्त आयुक्तांकडे आलीत. या देयकावर स्वास्थ अधीक्षक अरुण तिजारे यांची बनावट स्वाक्षरी आढळून आली. हा गोरखधंदा लक्षात येताच या प्रकरणी शेटे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, स्वच्छता अधिकारी अजय जाधव आणि अरुण तिजारेंना कारणे दाखवा नोटीस दिल्यात. त्यावर ती स्वाक्षरी आपली नसल्याचे तिजारेंनी म्हटले आहे. तर तिजारे यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला असता तर संबंधित संस्थेची देयके मंजुरी होण्यापुर्वीच रोखण्यात आले असते, असा खुलासा नैताम आणि जाधव यांनी दिला आहे. या खुलाशानंतरही ती बनावट स्वाक्षरी कुणी केली? हे मात्र अनुत्तरित आहेत.
गोरखधंद्याला जबाबदार कोण?
ती बनावट स्वाक्षरी आपली नाही, हे सांगून अरुण तिजारे मोकळे झालेत. मात्र सुमारे १० लाख रुपयांच्या देयकावर बनावट स्वाक्षरी करण्याचे धाडस कुणी केले, हे अनुत्तरित आहे.यंत्रणेला आव्हान देत एखादा कंत्राटदार किंवा त्रयस्थ व्यक्ती लाखोंच्या बिलावर बनावट स्वाक्षरी करीत असेल तर यापुर्वी असे प्रकार घडलेच नसावेत, याची शाश्वती देता येत नाही.त्यामुळे कारणे दाखवा नोटीसवर न थांबता या प्रकरणाचा छडा लावावा,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे साफसफाई देयकामध्ये आर्थिक गोलमाल केले जाते, या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे.