अस्मानी संकटाने हिरावला कुटुंबाचा आधारवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST2019-11-16T06:00:00+5:302019-11-16T06:00:51+5:30
अंगावर शहारे आणणारी ही स्थिती झाली आहे सिद्धनाथपूर येथील सुधाकर महादेव पाटेकर (४७) यांच्या चार मुलांची. ओल्या दुष्काळाने सर्व स्वप्नांचा चुराडा केला. सुधाकर पाटेकर यांची तीन व वडिलांच्या नावे असलेली तीन अशी एकूण सहा एकर कोरडवाहू शेती कुटुंबात आहे. त्यात पेरलेले सोयाबीन परतीच्या पावसाने सोयाबीन कुजले. हाती-मुठी जे आले, त्याला भाव नाही. अशा अस्मानी व सुलतानी संकटांनी बेजार झालेल्या सुधाकर यांनी इहयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. समोरच केवळ प्रश्नच दिसत असल्याने त्यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.

अस्मानी संकटाने हिरावला कुटुंबाचा आधारवड
संजय जेवडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : दोन महिन्यांपूर्वी आजोबा देवाघरी गेले. त्या धक्क्याने आजी वारली. या दु:खाची सल कमी होते ना होते तोच पित्याच्या रूपाने असलेला घराचा आधारवड कोसळला. आता जगायचे कसे अन् कुणासाठी? घरातील दहाही डोळे शून्यात हरवले आहेत. आभाळभर दु:खाने अश्रूही सुकले आहेत. डोळे आणि देहबोलीतून एकच आर्त हाक उठते आहे - तुम्ही असे करायला नको होते बाबा!
अंगावर शहारे आणणारी ही स्थिती झाली आहे सिद्धनाथपूर येथील सुधाकर महादेव पाटेकर (४७) यांच्या चार मुलांची. ओल्या दुष्काळाने सर्व स्वप्नांचा चुराडा केला. सुधाकर पाटेकर यांची तीन व वडिलांच्या नावे असलेली तीन अशी एकूण सहा एकर कोरडवाहू शेती कुटुंबात आहे. त्यात पेरलेले सोयाबीन परतीच्या पावसाने सोयाबीन कुजले. हाती-मुठी जे आले, त्याला भाव नाही. अशा अस्मानी व सुलतानी संकटांनी बेजार झालेल्या सुधाकर यांनी इहयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. समोरच केवळ प्रश्नच दिसत असल्याने त्यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. या निर्णयाने राणी, छकुली, वैशाली या तीन मुलींच्या पाठीवर झालेला चिमुकला अंश पोरका झाला. पतीच्या आत्महत्येनंतर चार मुलांना सांभाळण्याचे दिव्य वर्षा पाटेकर यांना पार पाडावे लागणार आहे.
दरम्यान, विष प्राशनानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या सुधाकर पाटेकर यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात नातेवाइकांनी आणले. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर गावात आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास पाटेकर या चुलतभावाने त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. सारे गाव शोकसागरात बुडाले. नवरात्रात वडील महादेवराव वारले. पाठोपाठ दिवाळीच्या आदल्या दिवशी आई विमलाबाईचाही मृत्यू झाला. आधीच कर्जबाजारीपणा व त्यात नातेवाइकांकडून वडिलाच्या आजारासाठी घेतलेली उसनवारी, घरी लग्नाची मुलगी, त्यात परतीच्या पावसाने सोयाबीन कुजून खराब झाले. आता पुढे काय, या प्रश्नाने ते सर्व सैरभैर झाले आहेत.
हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन परतीच्या पावसाने खराब झाले. शेतकरी पार खचून गेला आहे. अद्यापही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही.
- मनोहरराव पाटेकर,
शेतकरी, सिद्धनाथपूर.
परतीच्या पावसाने शेतकºयाच्या शेतातील सोयाबीन कुजले. त्या कुजलेल्या सोयाबीनला भाव नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने ही घटना घडली.
- सिद्धार्थ किर्दक,
सिद्धनाथपूर