जि.प.च्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत घोळ!
By Admin | Updated: May 24, 2017 01:40 IST2017-05-24T01:40:08+5:302017-05-24T01:40:08+5:30
कागदोपत्री खरेदी : लाभार्थींकडे म्हशी नसल्याचा कृषी-पशुसंवर्धन सभापतींचा आरोप

जि.प.च्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत घोळ!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विशेष घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत जिल्ह्यातील तालुका स्तरावर म्हशींची कागदोपत्री खरेदी दर्शविण्यात आली असून, वाटप करण्यात आलेल्या म्हशी लाभार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याचा आरोप खुद्द जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) दिलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत घोळ झाल्याची बाब समोर येत आहे.
विशेष घटक योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषद पशुसंंवर्धन विभागामार्फत दोन कोटी रुपयांच्या निधीतून दुधाळ जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विभागामार्फत जिल्ह्यातील ३१७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून, गत मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २८० लाभार्थ्यांना प्रत्येकी एक प्रमाणे ४० हजार रुपये किमतीच्या म्हशींचे वाटप करण्यात आले. तीन महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांना आणखी प्रत्येकी एक म्हैस याप्रमाणे वाटप करावयाचे आहे. दरम्यान, दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी म्हशींची कागदोपत्री खरेदी दर्शवून, प्रत्यक्षात म्हशींची खरेदी करण्यात आली नाही; तसेच खरेदी प्रक्रियेच्या माहितीच्या आधारे संबंधित लाभार्थ्यांकडे चौकशी केल्यास, लाभार्थ्यांकडे म्हशी उपलब्ध नाहीत; परंतु ज्यांच्याकडे म्हशी नाहीत; अशा व्यक्तींकडून म्हैस खरेदी केल्याबाबतचे दाखले मात्र घेण्यात आले, असा आरोप खुद्द जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांनी २२ मे रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) दिलेल्या पत्रात केला आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत घोळ झाल्याची बाब समोर येत आहे.
सभापतींची ‘सीईओं’कडे चौकशीची मागणी !
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे वाटप योजनेतील म्हशींच्या खरेदी प्रक्रियेसह लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या म्हशींबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांनी ‘सीईओं’कडे पत्राद्वारे केली आहे.
दुधाळ जनावरे वाटप योजनेत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून, लाभार्थींवर अन्याय झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून, संबंधितांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
- माधुरी गावंडे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जिल्हा परिषद
दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी २८० लाभार्थ्यांना म्हशींचे वाटप करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या म्हशी लाभार्थ्यांकडे आहेत की नाही, यासंदर्भात पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून (विस्तार) पडताळणी करण्यात येणार आहे.
-केशव मेहरे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद.