जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेटनिवडणूक : शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 11:06 IST2021-07-03T11:06:08+5:302021-07-03T11:06:18+5:30
Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections: शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच आघाडी अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेटनिवडणूक : शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार
अकाेला : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकत्र लढण्याच्या प्रयत्नांना काँग्रेसच्या स्वबळाचा अडसर ठरला असून, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच आघाडी अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पाेटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. पहिल्या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल हे उपस्थित हाेते; मात्र त्याच दिवशी दुपारी काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी स्वबळाचा नारा दिल्याने आघाडीत काँग्रेसचा सहभाग हाेण्याची शक्यता मावळली हाेती. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादीचे मंत्री डाॅ. राजेद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काँग्रेसला वगळूनच जागा वाटपावर चर्चा झाली. आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषदेचे विराेधी पक्षनेते गाेपाल दातकर, राष्ट्रवादीचे आमदार अमाेल मिटकरी, माजी आमदार तुकाराम बिडकर व जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या रंगल्या. अखेर शुक्रवारी आघाडी अंतिम झाली असून, हे दाेन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. या संदर्भात शनिवारी घाेषणा हाेण्याची शक्यता आहे.
असे आहे जागा वाटपाचे सूत्र
जिल्हा परिषदेच्या १४ जागांपैकी १० जागा शिवसेना व ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेस असे सूत्र ठरले आहे; मात्र राष्ट्रवादीला आणखी एक जागा वाढवून देण्याबाबत नेते आग्रही आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला एक जागा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर सेनेच्या नऊ जागांपैकी प्रहारला एक किंवा दाेन जागा साेडाव्या लागणार आहेत.
केवळ एक जागा हीच काँग्रेसची अडचण
जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या १४ जागांमध्ये काँग्रेसची एक जागा कमी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सहभाग घेतल्यावरही काँग्रेसला केवळ एकच जागा साेडण्याबाबत शिवसेना आग्रही हाेते. अशा स्थिती एक जागा घेऊन आघाडीत लढण्यापेक्षा स्वतंत्र लढणे काँग्रेससाठी फायद्याचेच आहे. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या स्वबळाचा नाराही आजमावण्याची संधी या निमित्ताने काँग्रेसला मिळणार आहे.