सायकलवरून पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:57 IST2021-01-08T04:57:05+5:302021-01-08T04:57:05+5:30
तेल्हारा: तालुक्यातील निंबोळी येथील २७ वर्षीय युवकाचा सायकलवरून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तेल्हारा ...

सायकलवरून पडून युवकाचा मृत्यू
तेल्हारा: तालुक्यातील निंबोळी येथील २७ वर्षीय युवकाचा सायकलवरून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घातपाताची शक्यता वर्तवली आहे. विष्णू श्रीकृष्ण रावणचौरे (वय २७, रा. निंबोळी) असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ग्राम निंबोळी येथील विष्णू श्रीकृष्ण रावणचौरे (२७, रा. निंबोळी) हा युवक मंगळवारी सायंकाळी मजुरीचे पैसे घेण्यासाठी मनब्दा येथे गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. बुधवारी पहाटे शेतरस्त्यावर तो मृत अवस्थेत आढळून आला. याबाबत तेल्हारा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शेळके यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला. युवकाचा मृत्यू सायकलवरून पडून झाल्याचे बोलले जात आहे; मात्र घटनास्थळ व सायकलची परिस्थिती बघता घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास ठाणेदार दिनेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली बिट जमादार जांभळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर मोरे करीत आहेत.