यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:15 IST2020-02-08T13:15:00+5:302020-02-08T13:15:14+5:30
शेतकऱ्यांनी घरच्या व स्थानिक पातळीवरील बियाण्याची तजवीज करू न ठेवण्याची गरज आहे.

यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवणार!
अकोला : गतवर्षीच्या अतिपावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, यावर्षीच्या खरीप हंगामात या पिकाच्या बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरच्या व स्थानिक पातळीवरील बियाण्याची तजवीज करू न ठेवण्याची गरज आहे. यादृष्टीने कृषी आयुक्तालयानेही पुढाकार घेतला आहे.
सोयाबीनचे राज्यात सर्वसाधारण ३५ लाख ५३ हजार ३२४ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी या पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. या वाढणाºया क्षेत्रासाठी जास्तीच्या बियाण्यांची गरज भासणार आहे; परंतु गतवर्षी उशिरा पाऊस आला आणि काढणीच्या वेळीही सतत पाऊस सुरू होता परिणामी सोयाबीनचे उत्पादन घटले असून, गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. म्हणूनच बियाणे उत्पादन क्षेत्रावर उत्पादित बियाणे आणि गत दोन वर्ष राज्यातील शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाण्यांची जी पेरणी केली होती. ते उत्पादित बियाणे यावर्षीच्या खरीप हंगामासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने राज्यातील शेतकरी पेरणी करतात ते सरळ वाण आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे हे बियाणे बदलण्याची गरज नाही. प्रमाणित बियाणे शेतकºयांनी पेरणी केल्यास उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होते, असा कृषी विभागाचा दावा आहे. त्यासाठी यातील चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचा चाळणी करू न निवड करणे तेवढेच गरजेचे आहे. विशेष म्हणजे सोयाबीनचे बाह्यावरण नाजूक व पातळ असते त्यामुळे शेतकºयांना हाताळणी करताना काळजी घ्यावी लागणार आहे. हे बियाणे प्लास्टिक पोत्यात साठवू नये. साठवण करण्यापूर्वी बियाणे दोन दिवस उन्हामध्ये ठेवून त्यातील आर्द्रता ९ ते १२ टक्के आणणे तेवढेच महत्त्वाचे आहे. साठवून ठेवलेल्या ठिकाणी किंवा खोलीमध्ये कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा तसेच उंदराचा उपद्रव टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच पेरपूर्वी घरीच बियाण्यांची उगणवशक्ती तपासून घेणे क्रमप्राप्त आहे. यावर्षी सोयाबीन बियाणे उपलब्धतेची व्याप्ती वाढावी व तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शेतकºयांनी यावर्षी काळजी घ्यावी लागणार आहे.
गतवर्षीच्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम झालेला असल्याची शक्यता असल्याने या बियाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी घरचे व स्थानिक बियाणे वापरावे लागेल. त्यादृष्टीने शेतकºयांनी काळजी घेण्याची गरज आहे.
- विजय घावटे,
कृषी संचालक,
निविष्ठा व गुण नियंत्रण,
कृषी आयुक्तालय, पुणे.