अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार महिलेस चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:35 IST2020-08-07T13:06:28+5:302020-08-07T17:35:42+5:30
प्रिती महल्ले (३९ ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार महिलेस चिरडले
अकोला : बोरगाव मंजू येथे बँकेत कर्तव्यावर जात असलेल्या एका दुचाकीस्वार महिलेचा भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर अकोला ते बाभूळगाव जहांगिर दरम्यान शुक्रवारी सकाळी घडली. प्रिती तक्षक ओळंबे- महल्ले (३९ ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
अकोल्यातील कौलखेड भागात राहणाºया प्रिती ओळंबे-महल्ले या बोरगाव मंजू येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत कार्यरत असून, त्या नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी आपल्या एम एच ३० ए एक्स ३१४८ क्रमांकाच्या दुचाकीने बोरगाव मंजूकडे जात असताना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अप्पू पॉइंटजवळ भरधाव येत असलेल्याअज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये प्रिती यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.