बोरगाव मंजूत महिलांचा एल्गार
By Admin | Updated: June 17, 2017 01:04 IST2017-06-17T01:04:34+5:302017-06-17T01:04:34+5:30
आज रास्ता रोको आंदोलन करणार : दारूच्या दुकानाविरुद्ध दिले ठाणेदारांना निवेदन

बोरगाव मंजूत महिलांचा एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू: महामार्गावर न्यायालयाच्या आदेशाने बंद झालेल्या दारूच्या दुकानाला गावात स्थानांतरित करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. भरवस्तीत होत असलेल्या या दारूच्या दुकानाविरुद्ध महिलांनी एल्गार पुकारला असून, १७ जून रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याविषयी महिलांनी ठाणेदारांना निवेदन दिले आहे.
१ एप्रिलपासून शहरातील देशी दारू दुकान, वाइनबार, बिअर शॉपी आदी दारूची दुकाने न्यायालयाच्या आदेशाने बंद केली; परंतु सदर दुकान हे नव्याने स्थानांतरित करू नये, अशी मागणी गावातील महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा पोलीस अधीक्षक, ठाणेदार बोरगाव मंजू यांना निवेदन देऊन केली होती; मात्र या निवेदनाची प्रशासनाने कुठलीही दखल न घेता या दारूच्या दुकालाना रामजीनगर, सिद्धार्थ नगर वॉर्ड क्र. ६ च्या भरवस्तीला लागून परवानगी दिली. त्यामुळे येथील महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सामान्य माणसाचे जनजीवन धोक्यात आले आहे. या देशी दारूच्या दुकानात दारुडे परिसरात धिंगाणा घालून महिलांचा अपमान करणे, अश्लील शिवीगाळ करणे आदीमुळे परिसरात दशहत निर्माण झाली असून, सदर देशी दारूचे दुकान त्वरित बंद करावे, या मागणीसाठी १७ जून रोजी महिलांनी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन ठाणेदार पी.के. काटकर यांना दिले आहे.