बुलडाणा जिल्ह्यात वादळी पाऊस
By Admin | Updated: June 6, 2016 02:27 IST2016-06-06T02:27:16+5:302016-06-06T02:27:16+5:30
झाडे उन्मळून पडल्याने बोथा-खामगाव मार्ग दीड तास बंद.

बुलडाणा जिल्ह्यात वादळी पाऊस
बुलडाणा : रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. या वादळाने ठिकठिकाणी घरावरची टिन पत्रे उडाली, तर झाडे उन्मळून पडल्याने बुलडाणा-बोथा-खामगाव मार्ग तब्बल दीड तास बंद होता. अचानक आलेल्या या वादळाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. अमडापूर, उन्द्री परिसरात जोरदार वादळाने शाळेवरील टिनपत्रे उडाली, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली. चिखली परिसरात तुरळक पाऊस झाला. बुलडाणा, धाड, चांडोळ, सागवन, कोलवड या भागात विजेच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. देऊळघाट येथे वादळी वार्याने झोपडपट्टी भागातील घरावरील टिनपत्रे उडाल्याने नुकसान झाले. तसेच पाडळी, दत्तपूर, उमाळा येथेसुद्धा झाडे उन्मळून पडली.
बुलडाणा परिसरात दुपारी चारच्या सुमारास अचानक वादळी वार्याला सुरुवात झाली. तब्बल अर्धा तास पाऊस झाल्याने रविवारच्या आठवडी बाजारात व्या पारी व नागरिकांची एकच धांदल उडाली. विशेष म्हणजे विजांचा कडकडाट झाल्याने बाजार गुंडाळावा लागला. उन्द्री येथे दुपारी चार वाजता वादळी वार्यासह दमदार पाऊस झाला. या वादळाने शिवाजी हायस्कूल व गुरूकृपा मराठी शाळेवरचे टिनपत्रे उडाली, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. उन्द्री येथे आठवडी बाजार असल्यामुळे या वादळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. मोताळा तालुक्यात धा.बढे, मोताळा परिसरातही जोरदार पाऊस झाला. रविवार, ५ जूनच्या दुपारी चार वाजेदरम्यान आकाशात ढग दाटून आले आणि वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. मान्सूनपूर्व पावसाची ही पहिलीच हजेरी असल्यामुळे दुपारपर्यंत असलेल्या उन्हाची दाहक ता कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता.