‘ग्रीन झोन’साठी हवा अकोलेकरांचा पुढाकार!

By Admin | Updated: June 17, 2017 01:07 IST2017-06-17T01:07:24+5:302017-06-17T01:07:24+5:30

तीन वर्षांची देखभाल दुरुस्ती; लाखो रुपयांची तरतूद

Wind Akolekar's initiative for 'Green Zone'! | ‘ग्रीन झोन’साठी हवा अकोलेकरांचा पुढाकार!

‘ग्रीन झोन’साठी हवा अकोलेकरांचा पुढाकार!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहराच्या तापमानात दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता आणि चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अकोलेकरांनी शहरात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. महापालिकेच्या ‘ग्रीन झोन’च्या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी नागरिकांनी समोर येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महापालिका क्षेत्रात टोलेजंग इमारती, लक्झरीयस सदनिका उभारण्याच्या नादात वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात आली. गल्ली-बोळांसह सर्व्हिस लाइनमध्येदेखील सिमेंट काँक्रिटीकरणाला प्राधान्य देण्यात आल्याचा परिणाम शहराच्या वातावरणावर झाला.
सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांमुळे उन्हाळ््यातील उकाडा असह्य होत चालला आहे. यावर कायम स्वरूपी उपाय म्हणून शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने ‘अमृत’योजनेंतर्गत ‘ग्रीन झोन’निर्माण करण्यासाठी मनपाकरिता ४ कोटींच्या निधीची तरतूद केली. ‘ग्रीन झोन’चा उद्देश सफल होण्यासाठी मनपाला किमान ५० हजार चौरस फूट पेक्षा अधिक जागेची आवश्यकता आहे. अशा जागांचा मनपाकडून शोध घेतला जात असून, जागेसाठी अकोलेकरांना आवाहन करण्यात आले आहे. ज्या जागा निश्चित झाल्या, त्यांचा प्रकल्प अहवाल (डीपीआर)तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

तीन वर्षांची देखभाल दुरुस्ती
५० हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असणाऱ्या जागेवर ‘ग्रीन झोन’उभारण्याची संकल्पना आहे. त्यामध्ये जागेला तारेचे कुंपण उभारणे, सावली देणाऱ्या मोठ्या वृक्षांचे रोपण करणे, हिरवळ निर्माण करणे, शोभीवंत झाडे लावणे, वयोवृद्धांसाठी बसण्यास बेंच, पाण्याची सुविधा, चौकीदाराची खोली, पथदिव्यांची सुविधा निर्माण करण्याचा समावेश आहे. तीन वर्षांपर्यंत देखभाल दुरुस्ती करण्याच्या बदल्यात मनपाने संबंधित ‘ग्रीन झोन’वर लाखो रुपयांची तरतूद केली आहे.

वातावरणावर होईल परिणाम
‘अमृत’योजनेंतर्गत शासनाने ‘ग्रीन झोन’साठी केलेली आर्थिक तरतूद पाहता केवळ वृक्ष लागवड करणे हा उद्देश नसून, त्याचे संगोपन करण्याचे निकष ठरवून देण्यात आले आहेत. ही संकल्पना शहरात पहिल्यांदाच राबवल्या जात असल्याने अकोलेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शहराच्या विविध भागात निर्माण केल्या जाणाऱ्या ‘ग्रीन झोन’मुळे पर्यावरणासह शहराच्या वातावरणात निश्चितच सकारात्मक परिणाम पहावयास मिळतील,असा जाणकारांना आशावाद आहे.

शहराला हिरवेगार करून आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अकोलेकरांनी समोर येण्याची गरज आहे. ‘ग्रीन झोन’निर्माण करण्यासोबतच आपल्याला शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करायचे आहे. याकरिता स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालयांसह वृक्षप्रेमींनी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा.
- अजय लहाने, आयुक्त मनपा.

Web Title: Wind Akolekar's initiative for 'Green Zone'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.