पश्चिम विदर्भाच्या नंदनवनाला भाविकांची पसंती!
By Admin | Updated: August 3, 2016 00:19 IST2016-08-03T00:19:07+5:302016-08-03T00:19:07+5:30
आनंद सागर येथे साडेतीन कोटी पर्यटकांनी घेतला आनंद.

पश्चिम विदर्भाच्या नंदनवनाला भाविकांची पसंती!
गजानन कलोरे / शेगाव (जि. बुलडाणा)
येथील आनंद सागरची ख्याती पश्चिम वर्हाडासोबतच सर्वदूर पोहोचली आहे. भक्ती, मनशांती आणि पर्यटनाचा आनंद मिळत असल्याने या ठिकाणी येणार्यांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. स्वत:शीच स्पर्धा करीत आनंद सागर आपल्या गर्दीचा उच्चांक मोडीत काढत आहे. विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या दर्शनासोबतच भाविकांना आनंद सागरची सहल होते.
श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ८ एप्रिल १९९९ साली आनंद सागरची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सुरुवातीला १२0 एकराच्या पहिल्या भागातील कामास सुरुवात करण्यात आली, तसेच आनंद सागरच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यातील प्रेक्षणीय स्थळांची पाहणी करण्यात आली.
त्यानंतर आकर्षक देखावे, तसेच समाजासाठी झटलेल्या, जगाचा उद्धार करणार्या १८ संतांच्या मूर्तीही येथे विराजमान करण्यात आल्या. आनंद सागरच्या निर्मितीसाठी राजस्थान येथील मार्बल आणि सॅन स्टोनचा वापर करण्यात आला, तसेच दोन लाख २0 हजार वृक्षांची लागवड करून हिरवळ जोपासण्यात आली. त्यानंतर सुमारे तीन वर्षांनंतर १२-१२-२00२ रोजी पहिल्या भागाचे काम पूर्ण झाले.
त्यानंतर १६ जानेवारी २00३ रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांच्याहस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. उद्घाटनानंतर पहिल्यावर्षी महाराष्ट्रासह देश आणि विदेशातील ३0 लाख भाविकांनी आनंद सागरला भेट दिली. तेरा वर्षांच्या कालावधीत ३0 लाखांच्या संख्येने सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी पर्यटनाचा आनंद लुटला आहे.
मान्यवरांच्या भेटी!
पश्चिम विदर्भाचे नंदनवन असलेल्या आनंद सागरला मान्यवरांसह विविध राजकीय पक्षांचे नेतेही भेट देतात. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनीही भेट दिली आहे.
राजस्थानी शैलीचे प्रवेशद्वार!
आनंद सागरचे प्रवेशद्वार राजस्थानी शैलीची आठवण करून देणारे असून, आध्यात्मिक मन:शांतीसाठी ध्यान मंडप, मत्स्यालय, झुलता पूल, खुला रंगमंच, संगीताच्या आधारावर जलधारा, आनंद सागरची सैर करणारी रेल्वे आदी आनंद सागरची वैशिष्टे आहेत.