पारशी समाजाचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: August 18, 2014 01:44 IST2014-08-18T01:36:36+5:302014-08-18T01:44:39+5:30
केवळ उरली तीन कुटुंब ; पारशी नवीन वर्ष विशेष

पारशी समाजाचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर
नितीन गव्हाळे / अकोला
पारशी माणूस म्हटला की आर्थिकदृष्ट्या सधन. ज्याही ठिकाणी पारशी समाज वास्तव्यास गेला. त्या ठिकाणी पारशी समाजाने त्या शहराच्या विकासाला हातभार लावला. अकोल्यासारख्या शहराच्या विकासामध्येही पारशी समाजाने हातभार लावला. उद्योग, व्यापाराच्या माध्यमातून अकोला शहरात स्वत:ची ओळख निर्माण करणार्या पारशी समाजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. कधीकाळी १00 च्या जवळपास संख्या असलेल्या पारशी समाजाची आजमितीस शहरात केवळ तीन कुटुंब उरली आहेत.
सोमवारपासून पारशी नवीन वर्षाला सुरुवात होते आहे. त्यानिमित्ताने शहरातील पारशी समाजाच्या योगदानाचा, त्यांच्या अस्तित्वाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ह्यलोकमतह्णने केला. १0 च्या दशकामध्ये इराणमधील पारशी उर्फ झरथुष्ट्र धर्माचे लोक अरबी आक्रमकांच्या अत्याचाराला त्रासून भारतामध्ये आले.
गुजरातसोबतच देशातील इतर राज्यांमध्ये दुधात साखर मिसळावी तसा हा समाज तेथील संस्कृतीशी समरस झाला.
अकोल्यासारख्या शहरामध्येही १८७0-८0 च्या काळात पारशी समाजातील काही कुटुंब स्थायिक झाली. उद्योग व व्यापाराच्या माध्यमातून पारशी समाजाने अल्पावधीतच शहरात स्वत:ची ओळख निर्माण केली; परंतु वैयक्तिक आयुष्यात प्रत्येक पारशी कुटुंबाने आपले खासगीपण जपले. त्यांच्या अग्यारीत अन्य धर्मियांना प्रवेश दिला जात नसल्याने या समाजाविषयी अन्य समाजाच्या मनात आदर आणि परकेपणाची भावनाही निर्माण झाली. आजमितीस तर पारशी समाज पूर्णत: परका होतो की काय, अशी खंत व्यक्त होऊ लागली.
*१९३८ च्या काळात उभारली अग्यारी
अग्यारी हे पारशी समाजाचे प्रार्थनास्थळ आहे. १९३८ च्या काळात शहरात पारशी समाजाने पंचायत समितीसमोर अग्यारी उभारली. ही अग्यारी पश्चिम विदर्भात एकमेव आहे. एकेकाळी पतेतीला या अग्यारीमध्ये चांगलीच वर्दळ पाहायला मिळायची; परंतु पारशींची संख्या कमी झाल्याने या अग्यारीमध्ये फारसं कुणी दिसत नाही. पारशी अग्यारी अस्तित्वाचं प्रतीक म्हणून उभी आहे.
*१९0१ मध्ये शहरात होते ८३ पारशी
१९0१ च्या काळात शहरामध्ये राहणार्या पारशींची संख्या ८३ होत; परंतु ती घटून केवळ १३ वर आली आहे. त्यामागची कारणे वेगवेगळी आहेत. शहरातील काही कुटुंबे शिक्षण, व्यापाराच्या दृष्टिकोनातून स्थलांतरित झाली. काही लोक मरण पावले. त्यामुळेच की काय? पारशींची संख्या शहरात बोटांवर मोजण्याइतपत राहिली आहे.