तेल्हारा तालुक्यातील ६९ गावांचा पाणीपुरवठा प्रस्ताव धूळ खात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:31+5:302021-01-13T04:46:31+5:30
तेल्हारा : तालुक्यातील ६९ गावांचा मजीप्रा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला; मात्र प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे धूळ खात पडलेला ...

तेल्हारा तालुक्यातील ६९ गावांचा पाणीपुरवठा प्रस्ताव धूळ खात !
तेल्हारा : तालुक्यातील ६९ गावांचा मजीप्रा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला; मात्र प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे धूळ खात पडलेला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा आदेश त्वरित द्यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जि.प. सदस्य अढाऊ यांनी दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, तालुक्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. तसेच अनेक गावे खारपाणपट्ट्यांत येत असल्याने गोड पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. पाणी भरण्याच्या कारणावरून अनेकदा तंटे उद्भवतात. परिणामी, अनेकदा कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होतो. तालुक्यातील पाण्याची पातळी ३०० ते ४०० फूट खोल गेली आहे. शासनाचे २०० फूटपर्यंत बोअरवेल खोदण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांना दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तालुक्यातील ६९ गावांसाठी पाणीपुरवठा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्य अभियंता अमरावती यांच्याकडे पाठविण्यात आला; मात्र अनेक दिवसांपासून प्रस्ताव धूळ खात पडून असल्याने पुढील कार्यवाही रखडली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी हा प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठविण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद बेलखेड सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदनातून केली आहे. त्यावर पाणीपुरवठामंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच माहिती घेऊन आदेश देऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती जि.प. सदस्य अढाऊ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (फोटो)