वऱ्हाडातील जलसाठ्यात झपाट्याने घट;  जलसंकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:28 AM2018-04-24T11:28:06+5:302018-04-24T11:33:11+5:30

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग सध्या १८ मि.मी. च्यावर वाढल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.

water reduction in water storage; water scarcity in vidarbha |  वऱ्हाडातील जलसाठ्यात झपाट्याने घट;  जलसंकट गडद

 वऱ्हाडातील जलसाठ्यात झपाट्याने घट;  जलसंकट गडद

Next
ठळक मुद्दे पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणे मिळून केवळ १९.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, बाष्पीभवनाचा वेग सध्या १८ मि.मी. च्यावर वाढल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. परिणाम पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, टॅँकरची मागणी वाढली आहे. नागरिक पाण्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे काढत आहेत. अकोल्यात आमदारांच्या निवासस्थानासमोर पाण्यासाठी लोटांगण आंदोलन केले.
यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणे मिळून केवळ १९.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. दीड महिन्यात या जलसाठ्यात २८ टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर ६.६५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे.
वऱ्हाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, नोव्हेंबर महिन्यात हा जलसाठा ४९.९७ टक्के होता. आता या सर्व प्रकल्पात आजमितीस १९.९९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. १९ एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात ६.६५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १०.२३ टक्के, निर्गुणा २.३२, उमा धरणात केवळ शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात सध्या ७०.६७ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.०८ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ०.० टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ११.२७ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ३२.९२, मसमध्ये शून्य टक्के, कोराडी ०.८६, पलढग १३.९८, मन ११.२७, तोरणा ७.३५ टक्के, तर उतावळी धरणात ११.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १५.८५ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, तर एकबुर्जी धरणात १.११ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात १४.७१ टक्के, अरुणावतीमध्ये ७.१४, तर बेंबळा धरणात १३.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ४१.५५ टक्के एवढा बऱ्यापैकी जलसाठा शिल्लक आहे.

- वऱ्हाडात नऊ मोठे प्रकल्प
१९ एप्रिलपर्यंत वऱ्हाडातील नऊ मोठ्या धरणात १९.९९ टक्के जलसाठा आहे. २३ मध्यम प्रकल्पात २१.९४ टक्के, तर ४५२ लघू प्रकल्पात ११.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या सर्व जलसाठ्यातील पाण्याची सरासरी टक्केवारी ही १९.९९ टक्के आहे. यातील लघू प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. त्यामुळे मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणीच वापरले जाणार आहे. त्यामुळे १९ टक्केपेक्षा कमी जलसाठा आजमितीस शिल्लक आहे.

 

Web Title: water reduction in water storage; water scarcity in vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.